Join us  

महेश सर असते तर चित्र वेगळं असतं! 'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाने मांडलं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांनी निक्कीला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 1:58 PM

Bigg Boss Marathi 5 : रितेशच्या होस्टिंगवर 'बिग बॉस मराठी'च्या एक्स स्पर्धकाने स्पष्ट मत मांडलं आहे.

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत आहे. रितेश त्याच्या स्टाइलने भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची शाळा घेत त्यांची कानउघाडणी करतो. रितेशच्या होस्टिंगवर 'बिग बॉस मराठी' फेम मिनल शाहने प्रतिक्रिया दिली आहे. मिनलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुखच्या होस्टिंगवर तिचं ठाम मत मांडलं आहे. 

मिनल शाह 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. तिने नुकतीच स्टार इंडिया मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला "आताचा सीझन रितेश देशमुख होस्ट करत आहेत. जर महेश मांजरेकर असते तर चित्र काय असतं?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, "महेश सर होस्ट असते तर चित्र पूर्ण वेगळं असतं. मी एक सांगेन की रितेश सर त्यांच्या पद्धतीने खूप चांगलं होस्ट करत आहेत. पण, या शोसाठी ते खूपच चांगले आहेत. या शोसाठी अशी व्यक्ती होस्ट पाहिजे जी आमच्यासारख्या बंडखोर स्पर्धकांची चांगली शाळा घेईल. महेश सर या शोसाठी परफेक्ट आहेत. माझ्या सीझनला किंवा गेल्या ३ सीझनला महेश सर होस्ट होते, म्हणून त्यांना घ्यायला पाहिजे, असं मी म्हणत नाहीये. पण, मला असं वाटतं की ते योग्य आहेत. कारण, त्यांना माहीत आहे की अशा स्पर्धकांना लाइनवर कसं आणायचं". 

"रितेश सर त्यांचे मुद्दे स्पर्धकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवतात. पण, ते अगदीच तुम्ही, आम्ही असं आदरार्थी बोलतात. आणि एकदम चांगल्या पद्धतीने समजवतात. पण, बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना चांगली पद्धत समजत नाही. त्यांना शाळा घेऊनच समजावलेलं कळतं. त्यामुळे माझ्याप्रमाणेच खूप सारे प्रेक्षकही महेश सरांना मिस करत असतील. त्यांची चावडी एकदम धमाल असायची. आता महेश सर असते तर निक्कीची सगळ्यात जास्त शाळा घेतली असती. आमच्या सीझनमध्ये मीराची शाळा महेश सर घ्यायचे. या सीझनमध्ये निक्की नुसता गोंधळ घालतेय. महेश सर असते तर त्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली असती. तिला चांगलंच बजावलं असतं. आणि तिच्यामध्ये बदलही दिसले असते", असंही मिनल पुढे म्हणाली. 

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातील टॉप ५ स्पर्धकांपैकी मिनल एक होती. विशाल निकम या पर्वाचा विजेता ठरला होता. पण, मिनलने तिच्या खेळीने सगळ्यांची मनं जिंकली होती. 

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखमहेश मांजरेकर टिव्ही कलाकार