Bigg Boss Marathi Season 5 : अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणाऱ्या 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळीने बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं होतं. वर्षा उसगावकरांशी वाद घालण्यापासून ते मराठी माणसाचा अपमान करण्यापर्यंत निक्की अनेक कारणांमुळे चर्चेत होती. पण, भाऊच्या धक्क्यावर मात्र रितेशने निक्कीला चांगलंच सुनावलं आणि मराठी माणसाची माफीही मागायला लावली.
शनिवारी रितेश देशमुखने निक्कीबरोबरच इतर सदस्यांचीही चांगलीच शाळा घेतली. पण, निक्कीची त्याने चांगलीच कानउघडणी केली. वर्षा उसगावकरांशी बोलताना अपशब्द वापरल्याबद्दल रितेशने निक्कीला चांगलंच सुनावलं. अशी भाषा बिग बॉसच्या घरात न वापरण्याची सक्त ताकीदही रितेशने तिला दिली. तर आर्याशी बोलताना निक्की मराठी माणसाची मेन्टॅलिटी काढत त्यांचा अपमान केल्याचं रितेश म्हणाला. आणि निक्कीला संपूर्ण महाराष्ट्राची आणि तमाम मराठी प्रेक्षकांची माफीही मागायला लावली.
निक्कीने कॅमेऱ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली. रितेशने कानउघाडणी केल्यानंतर मात्र निक्कीला अश्रू अनावर झाले. सगळ्यांसमोरच भाऊच्या धक्क्यावर निक्की ढसाढसा रडली. त्यानंतर तिने घरातील सगळ्यांची माफीही मागितली. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील पहिल्या आठवड्यात अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार हे सदस्य नॉमिनेट झाले होते. आता यांच्यापैकी कोणाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार हे आज कळेल.
'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक
वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण