Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवीन सीझन प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. या सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच अभिनेत्री निक्की तांबोळी चर्चेत आहे. निक्कीने घरी येताच दादागिरी आणि अरेरावीची भाषा सुरू केली होती. त्यानंतर रितेश देशमुखने कानउघाडणी केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात निक्कीचा आवाज कमी झाला होता. परंतु, आता पुन्हा निक्कीने घर डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. या सीझनच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच निक्कीने घरात राडा केला आहे. बिग बॉसच्या घरातील नवा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. पॅडीने निक्कीच्या कपड्यांना हात लावला म्हणून त्यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आहे. "माझ्या वस्तूला का हात लावला?" असं निक्की पॅडीला बोलत आहे. त्यावर पॅडी तिला म्हणतो, "माझी ड्युटी आहे". त्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पॅडीने कपड्यांना हात लावल्यामुळे निक्की घरातील सगळ्यांचे कपडे काढून फेकत असल्याचं दिसत आहे.
त्यानंतर धनंजय तिला "तू लाथ मारली माझ्या कपड्यांना..." असं रागात म्हणताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात निक्कीची दादागिरी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. तेवढ्यात अंकिता निक्कीला म्हणते की "तुझ्या आवाजाला घरातील सगळ्यांनी घाबरायचं का?". त्यावर निक्की तिला "हो तू घाबरशील" म्हटल्यानंतर अंकिता तिला "अगं चल" असं म्हणते. त्यानंतर निक्की आणि अंकितामध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, पहिल्या आठवड्यात किर्तनकार पुरषोत्तम दादा पाटील यांनी घरातून एक्झिट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात निक्की तांबोळी, योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. पण, बिग बॉसने ट्विस्ट आणत कोणालाच घराबाहेर काढलं नाही. आता या आठवड्यात नवीन कॅप्टन आणि नॉमिनेशनचा टास्क रंगलेला पाहायला मिळेल.