Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन खऱ्या अर्थाने खास ठरला आहे. बिग बॉस मराठीचा होस्ट बदलण्यापासून ते सदस्यांपर्यंत अनेक सरप्राइज यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळाले. रीलस्टार सूरज चव्हाणही यंदाच्या पर्वात सहभागी झाला आहे. गोलीगत धोका म्हणत बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतलेल्या सूरजला पाहून घरातील सदस्यांबरोबर चाहतेही आश्चर्यचकित झाले. सूरज त्याच्या हटके स्टाइलने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. त्याबरोबरच सूरजने बिग बॉसच्या घरात त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत.
गोलीगत धोका म्हणत बुक्कीत टेंगूळ देणाऱ्या सूरजला प्रेमात गोलीगत धोका मिळाला आहे. नुकतंच त्याने बिग बॉसच्या घरात हा खुलासा केला आहे. बिग बॉसच्या घरातील सूरजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सूरज निक्की आणि छोटा पुढारीशी बोलताना दिसत आहे. यामध्ये निक्की सूरजला "प्रेमात धोका मिळालाय का?" असं विचारताना दिसत आहे. त्यावर सूरज प्रेमात गोलीगत धोका मिळाल्याचं कबूल करतो. "तू प्रेम केलं होतं? तिला बुक्कीत टेंगूळ तर नाही दिला ना?" असं निक्की सूरजला विचारते. त्यानंतर सूरज त्याची अधुरी प्रेम कहाणी सांगतो.
सूरज म्हणतो, "माझ्याबरोबर ती चांगली राहायची, बोलायची...पण, तिला नंतर दुसरा चांगला गोरा पान दिसणारा मुलगा आवडला. मग ती लगेच मला सोडून गेली. मला तिने गोलीगत धोका दिला. मला खूप राग आला होता. मी तेव्हाच ठरवलेलं काहीतरी बनून दाखवणार. मग मी मोठा स्टार झालो. लोकांच्या मनावर गोलीगत राज्य केलं. माझी झापुक झुपुक गाणी वाजतात...". त्यानंतर निक्की त्याला त्या मुलीचं नाव आणि तिला कधी परत बघितलं का? असं विचारते. त्यावर सूरज म्हणतो की "नाही बघितलं...तिचं नाव सांगणार नाही. तिचं चांगलं चाललंय...उलट मला भारी वाटतंय...ती तिच्या आयुष्यात खूश आहे".