तो आला... अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi 5)चा सूत्रसंचालक आणि महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh). यंदाच्या बिग बॉस शोचं तो सूत्रसंचालन कळल्यानंतर त्याचे चाहते खूश झाले होते. 'बिग बॉस मराठी'च्या ग्रॅण्ड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला. त्याची स्टाईल 'बिग बॉस' प्रेमींच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्याचा परिणाम टीआरपीवर पाहायला मिळाला आहे.'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनने इतिहास रचला आहे.
मराठी मनोरंजनाचा बॉस असणाऱ्या या कार्यक्रमाच्या 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात ३.२ TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. शाळा, कॉलेज, ट्रेन, भाजीमार्केट कुठेही जा सर्वत्र फक्त 'बिग बॉस मराठी' आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चर्चा होताना दिसत आहे. या नव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करत २.४ TVR मिळवला आहे. वीकेंडचं सरासरी रेटिंग २.८ TVR आहे. संपूर्ण महाराष्ट्राला 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचे वेड लागल्याचे हे पुरावे आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधील 'भाऊचा धक्का' रितेश देशमुख चांगलाच गाजवत आहे. या यशाबद्दल रितेश देशमुख म्हणाला, बिग बॉस मराठी'च्या यशामध्ये आपल्या प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. रेटिंगचा चढता आलेख पाहणं खूपच सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. भाऊच्या धक्क्यासह सर्वच एपिसोडवर महाराष्ट्रभरातील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे ऋणी आहोत. मला ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठी वाहिनीचे मी खूप आभारी आहे.