Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेचा अपमान केल्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं होतं. जान्हवीने पॅडीच्या करिअरबद्दल आणि त्याच्या अभिनयाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला होता. त्यानंतर शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीची शाळा घेत तिला योग्य जागा दाखवली. रितेशने जान्हवीला बाहेरचा रस्ता दाखवत तिची रवानगी थेट तुरुंगात केली आहे.
रितेशने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची कानउघाडणी करत ती बिग बॉस मराठीच्या इतिसाहासातील सर्वात वाईट स्पर्धक असल्याचं म्हटलं. तसंच रितेशने जान्हवीला खोटं वागत असल्याचंही म्हटलं. गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला आलेली चक्करही तिने केलेलं नाटक असल्याचं म्हणत रितेशने जान्हवीला सुनावलं. "तुमचा माज, तुमची दादागिरी, तुमचा उर्मटपणा हे आज इथे बंद होणार आहे. तुम्ही सर्वांना म्हणता ना की, मी तुम्हाला बाहेर काढेन. जान्हवी आज मी तुम्हाला बाहेर काढतो", असं म्हणत रितेश जान्हवीला तुरुंगात टाकतो. आता जान्हवीला गार्डन एरियामधील जेलमध्ये १ आठवडा राहायची शिक्षा मिळाली आहे. त्याबरोबरच तिला या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरही सहभागी होता येणार नसल्याचं रितेशने म्हटलं आहे.
जान्हवीनंतर रितेशने निक्कीलाही चांगलंच सुनावलं. निक्कीने पॅडीला जोकर म्हणून हिणवलं होतं. त्यावरुन रितेशने निक्कीला खडे बोल सुनावले. त्याबरोबरच निक्कीने अंकिताला "काम नाही म्हणून घरात आल्याचं" म्हटलं होतं. यावरुनही रितेशने निक्कीचा समाचार घेतला. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू सदस्यांमधील समीकरणं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा आणि आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट झाले आहेत. आता या आठवड्यात कोणाचा प्रवास संपतो, हे रविवारी कळेल.