Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्यात दुसऱ्या कॅप्टनसाठी टास्क खेळवला गेला. या टास्कमध्ये विजयी होत अरबाज पटेल हा या आठवड्यासाठी बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झाला आहे. बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क पार पडताना वैभव दुसऱ्या टीममध्ये होता. पण, त्याने अरबाज, निक्की आणि जान्हवीच्या टीमला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. यावरुन आता रितेश देशमुख त्याची भाऊच्या धक्क्यावर शाळा घेणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
यंदाच्या आठवड्याचा भाऊच्या धक्क्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रितेशने वैभवला खडे बोल सुनावल्याचे दिसत आहे. रितेश वैभवला म्हणतो, "आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका". रितेश घरातील सदस्यांना विचारतो की "बॉर्डरवरचा सैनिक समोरच्या सैनिकावर गोळ्या झाडण्यापेक्षा आपल्या सैनिकावर गोळ्या झाडतो याला काय म्हणतात?". त्यावर घरातील सदस्य फितूर, शत्रू, धोकेबाज, गद्दार असं म्हणतात.
पुढे रितेश वैभवला म्हणतो, "बोलायला जिगर लागते. ही जिगर बाजारात प्रोटीनच्या डब्ब्यात मिळत नाही. ही जिगर तुमच्यात दिसत नाही. इथून पुढे तुमच्यावर कोणी विश्वास का ठेवायचा. तुमच्या आत आहे तेच बाहेर दिसणार आहे. प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झालाय. मला बघायचंय ही मैत्री कधीपर्यंत टिकते. आम्ही आतमध्ये वैभव पाठवलंय गद्दार म्हणून बाहेर पडू नका".
दरम्यान, यंदाच्या आठवड्यात कॅप्टन झाल्यामुळे अरबाज या आठवड्यासाठी सेफ आहे. तर योगिता चव्हाण, निखिल दामले, अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोणत्या सदस्याचा प्रवास या आठवड्यात संपणार हे पाहावं लागेल.