Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसरा आठवडाही स्पर्धकांनी गाजवला. बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीने घर डोक्यावर घेतलं होतं. पण, रितेश देशमुखने कानउघाडणी केल्यानंतर निक्की थोडी शांत झालेली पाहायला मिळाली. पण, या आठवड्यात मात्र जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात कल्ला केला होता. सूरज चव्हाणशी क्षुल्लक गोष्टीवरुन भांडण करण्यापासून ते वर्षा उसगावकरांबद्दल अपशब्द वापरण्यापर्यंत अनेक कारणांमुळे जान्हवी चर्चेत होती. पण, घरातील इतर सदस्यांवर अरेरावी करणं जान्हवीला महागात पडणार आहे. रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर जान्हवीची चांगलीच शाळा घेणार आहे.
बिग बॉस मराठी ५ च्या दुसऱ्या आठवड्यातील भाऊचा धक्का आज होणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रितेश जान्हवीची खरडपट्टी काढताना दिसत आहे. जान्हवी अभिजीतला "बांगड्या घालायच्या होत्या मग", असं म्हणाली होती. या प्रोमोमध्ये रितेशने यावरुन तिला सुनावलं आहे. "जान्हवी अभिजीतला तुम्ही म्हणालात की बांगड्या घाल...बांगड्या घाल म्हणजे काय? बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे. याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात. मी बाकीच्यांना बाहेर काढेन का नाही माहीत नाही. पण, तुम्हाला नक्की काढेन", असं रितेश जान्हवीला म्हणतो. त्यानंतर जान्हवी रडत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
यंदाच्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार येणार आहे. अक्षय कुमार रितेश देशमुखसह स्पर्धकांची शाळा घेणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबरोबरच प्रेक्षकांसाठीही यंदाच्या आठवड्यातील भाऊचा धक्का खास असणार आहे. अक्षय त्याचा आगामी सिनेमा 'खेल खेल मे'च्या प्रमोशनसाठी बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच अक्षय कुमार बिग बॉस मराठीमध्ये दिसणार आहे.
दरम्यान, पहिल्या आठवड्यात किर्तनकार पुरषोत्तम दादा पाटील यांचा प्रवास संपला होत. या आठवड्यात निक्की तांबोळी, योगिता चव्हाण, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, निखिल दामले, घनश्याम दरवडे हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोणाचा प्रवास या आठवड्यात संपेल, हे लवकरच कळणार आहे.