Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा खेळ रंगतदार झालेला असतनाच बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. संग्रामने घरात येताच निक्की आणि अरबाजशी पंगा घेतल्याने बिग बॉसच्या घरातील समीकरणंही बदलत असल्याचं पाहायला मिळत होतं. पण, अचानक आता संग्रामला बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे.
टास्कदरम्यान संग्रामच्या हाताला जबर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी मोठी होती की संग्रामच्या डाव्या हाताच्या मनगटाच्या भागाला फ्रॅक्चर झालं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे संग्रामला बिग बॉस मराठीचा खेळ अर्ध्यावरच सोडावा लागला. संग्रामने शनिवारी घरातील प्रेक्षकांचा निरोप घेत बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट घेतली. हाताला झालेल्या दुखापतीमुळे अवघ्या १४ दिवसांतच बिग बॉस मराठीमधून संग्रामला बाहेर पडावं लागलं आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर संग्रामने भावुक पोस्ट शेअर केली आहे.
"काही दुखापतींमुळे मला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागत आहे...पण, आपली भेट लवकरच होईल. तुम्ही आजपर्यंत जे प्रेम दिलं ते मी सोबत घेऊन जातोय आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेमंच मला लवकर बरं व्हायला मदत करेल!", असं संग्रामने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत संग्रामच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. आता यातील कोणाचा प्रवास संपतो, हे पाहावं लागेल. गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणचा घरातील प्रवास संपला. तर निक्कीच्या कानाखाली मारल्याने आर्याला घरातून एक्झिट घ्यावी लागली होती.