Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहेत. यंदाच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना एकामागोमाग एक सरप्राइजेस मिळत आहेत. 'बिग बॉस मराठी'मध्ये यंदा रीलस्टार सूरज चव्हाणदेखील सहभागी झाला आहे. सूरज चव्हाणला 'बिग बॉस मराठी'च्या घरात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केलं गेलं.
गुलीगत धोका म्हणत प्रसिद्धीझोतात आलेल्या सूरजची घरची परिस्थिती मात्र बेताचीच आहे. बालपणापासून त्याने हलाखीचं आयुष्य जगलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सूरजने त्याच्या बालपणाबद्दल आणि कठीण काळाबद्दल सांगितलं. कॅन्सरमुळे सूरज चव्हाणच्या वडिलांचं लहानपणीच निधन झालं. तर वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरू न शकल्यामुळे त्याच्या आईचाही मृत्यू झाला. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपल्याने बहिणींनी त्याचा सांभाळ केला.
सूरज म्हणाला, "माझी परिस्थिती खूप वाईट होती. माझ्या वडिलांना कॅन्सर होता. त्यातच त्यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर आई खचून गेली होती. टेन्शनमुळे माझ्या आईला वेड लागलं होतं. तिला रक्ताच्या उलट्या व्हायच्या. तिला खूप त्रास व्हायचा. ती सारखा वडिलांचाच विचार करायची. तिचाही मृत्यू झाला. एकाच वेळी माझी आई आणि आजीचं निधन झालं. आजी, आजोबा, आईवडील कोणीच नाही. फक्त एक आत्या आहे. आणि पाच बहिणी आहेत. मला लोकांनी खूप फसवलं आहे आणि लुटलं आहे. त्यामुळे माझ्या बहिणी म्हणतात की तू सुधर, तर आम्हाला खूप बरं वाटेल. टिकटॉक होतं तेव्हा मला उद्घाटनाला एका दिवसाला ८० हजार मिळायचे. आता ३०-५० हजार रुपये मिळतात".
टिकटॉकमुळे सूरज प्रसिद्धीझोतात आला. पण, पैसे मिळाल्यानंतर मात्र त्याची जवळच्या लोकांकडून फसवणूक झाली. सोशल मीडिया स्टार धनंजय पोवार यांनी याबाबत 'बिग बॉस मराठी'च्या घरात खुलासा केला. ते म्हणाले, "आमच्या आधीपासून सूरज काम करतो. आम्ही त्याचे व्हिडिओ पाहायचो. आमचे शून्य फॉलोवर्स असताना त्याचे २-३ लाख फॉलोवर्स होते. पण, त्याला ते कंटिन्यू करता आलं नाही. तो समाजापासून वंचित आहे. समाज आपल्याबरोबर कसा वागतोय, हे त्याला कळत नाही. त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी त्याला सपोर्ट केला नाही. त्याचा गैरफायदा घेतला. तो खूप फेमस झाला होता. त्याच्या नावाचे शर्ट निघाले होते".