Join us  

Bigg Boss Marathi : "अभिजीत सावंतला वोट करा", सोनू निगमचं चाहत्यांना आवाहन, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 11:24 AM

अभिजीतला त्याच्या चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आता बॉलिवूडचा सिंगर सोनू निगम अभिजीतला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनालेला अवघे दोन दिवस राहिले आहेत. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट आहेत. यापैकी कोण बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 

अभिजीत सावंतने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. उत्तम खेळाबरोबरच माणुसकीचं एक उत्कृष्ट उदाहरण अभिजीतने प्रेक्षकांपुढे ठेवलं आहे. अभिजीतला त्याच्या चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. आता बॉलिवूडचा सिंगर सोनू निगम अभिजीतला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उतरला आहे. अभिजीतला वोट करण्यासाठी सोनू निगमने चाहत्यांना आवाहन केलं आहे. 

"अभिजीत तू बिग बॉस मराठीच्या घरात उत्तम खेळ खेळत आहेस. मी तुला खूप वर्षांपासून ओळखतो. तुला माझ्या शुभेच्छा. तू जे करशील ते चांगलंच करशील. अभिजीतला वोट करा, असं मी सगळ्यांना आवाहन करतो. खूप सारं प्रेम", असं सोनू निगमने व्हिडिओत म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडिओ अभिजीत सावंतच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.  

दरम्यान, ६ ऑक्टोबरला 'बिग बॉस मराठी'चा अंतिम सोहळा रंगणार असून 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता मिळणार आहे. वर्षा उसगावकर यांनी गुरुवारी(३ ऑक्टोबर) बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आज आणखी एक सदस्य बिग बॉस मराठीचा निरोप घेणार आहे. त्यामुळे या सीझनचे टॉप ५ आज मिळणार आहेत.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारअभिजीत सावंतसोनू निगम