Join us  

"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 2:17 PM

बिग बॉस मराठीचा विनर झाल्यानंतर सूरजने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्या पैशाचं काय करणार? याबाबतही सूरजने मुलाखतीत सांगितलं.

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. सूरज चव्हाणने यंदाच्या बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.  बिग बॉस मराठीचा विनर झाल्यानंतर सूरजने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. यावेळी त्याने बिग बॉसच्या घरातील किस्से आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्या पैशाचं काय करणार? याबाबतही सूरजने मुलाखतीत सांगितलं.

बिग बॉस जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशातून गावी घर बांधणार असल्याचं सूरजने आधीच सांगितलं आहे. पण, त्याबरोबरच एक खूप महत्त्वाची गोष्ट सूरज त्याच्या घरात करणार आहे. "बिग बॉसच्या पैशातून काय करणार?" असा प्रश्न विचारल्यानंतर सूरज म्हणाला, "बिग बॉसचं नाव माझ्या घरावर लिहिणार आहे. माझ्या बायकोसाठी टॉयलेट, बाथरुम बांधणार. आमच्या गावात टॉयलेट नाही. त्यामुळे माझी बायको कुठे बाहेर गेली नाही पाहिजे. म्हणून मी तिच्यासाठी हे सगळं करणार. मला गावासाठीही काहीतरी करायचं आहे. गावात पाण्याचा प्रॉब्लेम आहे. माझी आई डोक्यावर ४ हंडे भरुन आणायची. तर गावात पाण्यासाठी प्रयत्न करेन". सूरजने या उत्तराने पु्न्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याचं कौतुक होत आहे. 

दरम्यान, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवलं होतं. सूरजने सर्वाधिक वोट मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिजीत फर्स्ट रनर अप ठरला तर निक्की तांबोळीला तिसरं स्थान मिळालं. धनंजय पोवार चौथ्या तर अंकिता वालावलकर पाचव्या स्थानावर राहिली. ९ लाख रुपयांची बॅग घेऊन जान्हवी किल्लेकरने सहाव्या क्रमांकावर राहणं पसंत केलं. 

बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला 'बिग बॉस मराठी ५'चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला  १४.६० लाख रुपये मिळाले आहेत. तर इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार