'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनमध्ये दुसऱ्याच दिवशी स्पर्धकांमध्ये वाद घडलेला दिसून येतोय. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यात हा वाद रंगलेला दिसतोय. वर्षा उसगावकरांच्या एका चुकीमुळे 'बिग बॉस'ने सदस्यांना जमिनीवर आणलं आहे. वर्षा उसगांवकरांमुळे जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा राग अनावर झालेला आजच्या भागात पाहायला मिळेल.
वर्षा उसगावकर झोपल्या पण सर्वांना शिक्षा
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगांवकर झोपल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासकट घरातील इतर सदस्यांनाही 'बिग बॉस'ने शिक्षा दिली. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"आपल्याला बेडचा वापर करण्याची परवानगी नाही". 'बिग बॉस'च्या या आदेशानंतर घरातील सर्व सदस्य चिंतेत येतात. वर्षा उसगांवकर 'बिग बॉस'ला म्हणाल्या,"चुकून झालं".
निक्कीचा वर्षाताईंवर पारा चढला
या गोष्टीमुळे पारा चढलेली निक्की म्हणते, "आम्हाला भोगावं लागतंय..तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय". यावर वर्षा म्हणतात,"माझ्या एकटीमुळे नाही". त्यावर निक्की म्हणते,"तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती". निक्कीला शांत करत वर्षा ताई म्हणतात,"आरडाओरडा करू नको". तरीही निक्की शांत बसत नाही उलट त्यांना प्रतिउत्तर देत त्यांनाच शांत बसण्यास सांगते. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांना आता बेडचा वापर करता येणार नाही. निक्की आणि वर्षाताईंचा चढलेला पारा 'बिग बॉस' प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी देणारा ठरेल.