Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी ५चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. बुक्कीत टेंगूळ देत सूरज चव्हाणने त्याच्या झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीची ट्रॉफी उचलली. बिग बॉस मराठी ५ चा विजेता झाल्यानंतर बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सूरजने दर्शन घेतलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सूरजबरोबर बिग बॉस मराठीचा उपविजेता ठरलेला अभिजीत सावंतही सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सूरज आणि अभिजीतने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सिद्धिविनायकाच्या दरबारात अभिजीत आणि सूरजने गणरायाचा जयजयकार केला. बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेल्या सूरज आणि अभिजीतला पाहण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवलं होतं. सूरजने सर्वाधिक वोट मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिजीत फर्स्ट रनर अप ठरला तर निक्की तांबोळीला तिसरं स्थान मिळालं. धनंजय पोवार चौथ्या तर अंकिता वालावलकर पाचव्या स्थानावर राहिली. ९ लाख रुपयांची बॅग घेऊन जान्हवी किल्लेकरने सहाव्या क्रमांकावर राहणं पसंत केलं.
बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला 'बिग बॉस मराठी ५'चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला १४.६० लाख रुपये मिळाले आहेत. तर इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली आहे.