Suraj Chavan: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) शो गाजवणारा बारामतीचा पठ्ठ्या सूरज चव्हाण आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. 'बिग बॉस'च्या घरात आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने त्याने साऱ्यांचीच मनं जिंकली. हालाखीच्या परिस्थितीतून वर येत सुरजने स्वतःचं वेगळं असं छान विश्व तयार केलं. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत येत असतो. दरम्यान, सोशल मीडियावर सूरजचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
आई-बाबांचं निधनानंतर बहिणींच्या आधारात वाढलेल्या सूरजने अत्यंत हालीखीत दिवस काढले. गरिब परिस्थितीमुळे सूरज चव्हाणला फारसं शिक्षणही घेता आलं नाही. त्यामुळे सूरजला बऱ्याचदा फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, सूरज आता गावाकडे गेल्यानंतर तिकडे रमल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच नुकतीच सूरजने त्याच्या गावाकडील शाळेत जाऊन शाळकरी मुलांची भेट घेतली त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. वसेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सूरजने नुकतीच भेट दिली. तिथे जाऊन विद्यार्थांसोबत तो संवाद साधताना दिसतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सूरज चव्हाण या व्हिडीओमध्ये शाळकरी मुलांना म्हणतो, "काय मग बरंय ना? चांगलं शिकताय, अजून मोठं व्हायचंय. खूप शिक्षण घ्या. मला जमलं नाही शिक्षण घ्यायला पण, तुम्ही असं करु नका, खूप शिक्षण घ्या. खूप मोठे व्हा. मी कसा ‘बिग बॉस किंग’ झालो ‘झापुक झुपूक’ करून तसे तुम्ही पण पुढे जा पण, शिक्षण घेऊन मोठे व्हा." असा मोलाचा संदेश त्याने या लहान मुलांना दिला आहे.
सूरजचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचं तोंडभरून कौतुक करत आहेत. त्याच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने "सुरज भाऊंनी लोकांचे मन जिंकले", अशी कमेंट केली आहे तर आणखी एका यूजरने म्हटलंय, "लाखमोलाचं बोलून गेलास".