Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. सीझन सुरु होऊन ३० दिवस उलटून गेले आहेत. सदस्य घरात आठवडाभर कल्ला घालतात आणि विकेंडला भाऊच्या धक्क्यावर (Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka) होस्ट रितेश देशमुख त्यांची शाळा घेतो. प्रेक्षक मात्र भाऊचा धक्का पाहण्यासाठी उत्सुक असतात. आजही भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना डान्सचा तडका पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य एकापेक्षा एक लयभारी डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठीमध्ये आज भाऊच्या धक्क्यावर सदस्य वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर सूरजची झापुक झुपुक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळणार आहे. सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे कोंबडी पळाली गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. यावेळी सूरज जान्हवीला उचलून घेताना प्रोमोमध्ये दिसतोय. त्या दोघांची केमिस्ट्री सर्वांच्याच पसंतीस उतरणार आहे.
तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर अरबाज-आर्या आणि अभिजीत-निक्कीचा कपल डान्सदेखील पाहायला मिळणार आहे. अभिजीत-निक्की हे 'ये कैसा लड़का हैं' या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत. तर अरबाज-आर्या हे डान्स करताना एकमेकांना घट्ट मिठी मारताना पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांपैकी कोणाचा अंदाज भारी ठरणार? हे आजच्या भागात कळेल. सर्व जोड्यांचा कल्ला पाहण्यासाठी 'बिग बॉस प्रेमी' खूप उत्सुक आहेत.