'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 11:58 AM2024-12-09T11:58:43+5:302024-12-09T11:59:07+5:30
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत वर्णी लागली आहे. मालिका रंजक वळणावर असतानाच आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.
'शिवा' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधतीच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील आशू आणि शिवा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'शिवा' मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिकेत आहेत. पूर्वा या मालिकेत शिवा तर शाल्व आशूच्या भूमिकेत आहे. ही मालिका रंजक वळणावर असतानाच आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'शिवा' मालिकेत वर्णी लागली आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे 'शिवा' मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत तिची एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये तिची झलक दिसली आहे. 'शिवा' मालिकेच्या फॅन पेजवरुन हा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'शिवा' मालिकेत अमृता नेहा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. एकीकडे शिवा आणि आशूचं नातं खुलत असताना नेहाची एन्ट्री झाली आहे. नेहामुळे शिवा आणि आशूच्या नात्यात दुरावा येणार का? हे येणाऱ्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, 'शिवा' या मालिकेतून अमृता झी मराठीवर पुनरागमन करत आहे. याआधी अमृता मिसेस मुख्यमंत्री मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेनेच अमृताला लोकप्रियता मिळवून दिली होती. अमृता धोंगडे हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात ती सहभागी झाली होती.