बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गाजवलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने गाडी चालवताना तिला आलेला संतापजनक अनुभव शेअर केलाय. जान्हवी म्हणाली, "रस्ता पूर्ण खोदलेला होता. मुंबईत सध्या सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत. एकच गाडी पास होईल एवढाच रस्ता शिल्लक होता. समोरुन एक ट्रक येत होता. पण तो तिथेच थांबला होता. त्यामुळे दुसरी गाडी पास होणं शक्य नव्हतं. त्याच्यावर एक-दोन माणसं अरे मॅडम चलो ना, चलो ना.. असं म्हणायला लागली. मी त्यांना स्पष्ट सांगितलं माझी गाडी इथून पास होणार नाही. आणि मी इथून गाडी नेणार नाही."
जान्हवी पुढे म्हणाली, "लोकांना बोलायला काय, आपल्याला माहितीये आपण महागड्या गाड्या घेतो. जर त्या गाडीला स्क्रॅच गेला किंवा काहीही झालं तर हे भरुन देणारेत का? नाही! त्यापेक्षा दोन मिनिटं थांबा. त्या ट्रकला पास होऊ द्या मग आपण गाडी काढू. म्हणजे धीर हा नसतोच लोकांना. त्याच्यावर एक म्हणाला, चलानी नही आती गाडी तो फिर चलाते क्यू हो. माझ्याठिकाणी एखादा पुरुष तिथे बसला असेल आणि तो म्हणाला असता की, यहा से गाडी नही पास होगी तर लोक ओके म्हणाले असते. पण हे एका मुलीने सांगितलंय ना. मुलींना काय अक्कलच नसते. त्यांना गाडी चालवण्याचा सेन्सच नसतो."
जान्हवी शेवटी म्हणाली की, "हा जो काही भेदभाव आहे तो कधी बंद होणारेय आपल्या समाजात. मी बिग बॉसमध्ये असतानाही मुलं हे करु शकतात, मुली हे करु शकत नाहीत. हा भेदभाव का आहे. सगळे समान आहेत. सगळे सगळ्या गोष्टी करु शकतात" अशाप्रकारे जान्हवीने लोकांच्या मानसिकतेला फटकारलं. जान्हवी लवकरच स्टार प्रवाहवरील 'अबोली' मालिकेत काम करणार आहे.