Join us

संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 11:23 IST

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने शिवसेना एकनाथ शिंदेंच्या गटाचे उमेदवार संजय निरुपम यांना पाठिंबा दर्शविला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याचं दिसत आहे. २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी आज राजकीय पक्षांकडे प्रचार करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळेच सर्वच पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. अनेक सेलिब्रिटीही राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीमध्ये दिसत आहेत. अशातच आता बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने शिवसेना एकनाथ शिंदेंच्या गटाचे उमेदवार संजय निरुपम यांना पाठिंबा दर्शविला आहे. 

जान्हवीने संजय निरुपम यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे. यामधून तिने चाहत्यांना संजय निरुपम यांनाच वोट करण्याचं आवाहन केलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ जान्हवीने शेअर केला आहे. "दिंडोशी विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके संजय निरुपम सर हे यावेळी उभे आहेत. दिंडोशीकरांनी मी नम्र विनंती करते की सगळ्यांनी न विसरता येत्या २० नोव्हेंबरला धनुष्यबाणालाच आपलं मत द्यायचं आहे. आणि आपल्या दिंडोशीचा विकास करायचा आहे. धनुष्यबाणाच्या ४ नंबरच्या बटणावर क्लिक करून तुमचं अमुल्य मत द्या. आपल्याला संजय निरुमपदादांना विजयी करून दिंडोशीचा विकास करायचा आहे", असं जान्हवी या व्हिडिओत म्हणत आहे. 

पण, जान्हवीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. शिंदेंच्या उमेदवाराचा अशा रितीने प्रचार करणं चाहत्यांना रुचलेलं नाही. जान्हवीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. "किती पैसे मिळाले एक रील बनवायला?", "याच्यासाठी तुम्हाला बिग बॉसमध्ये वोच केलं का?", "किती खोके पोहोचले तुम्हाला?", "हे बिग बॉस नाही मॅडम", "तू कोण लागून गेली तू बोलशील तिथे देऊ?" असं म्हणत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, राज्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत राजकीय पक्षांना सत्ता स्थापनेसाठी वेळ देण्यात आला आहे. 

टॅग्स :संजय निरुपमटिव्ही कलाकारशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४