अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'बिग बॉस मराठी ५'मुळे जान्हवी प्रसिद्धीझोतात आली होती. 'बिग बॉस'च्या घरात वादग्रस्त वक्तव्ये केल्यानंतर जान्हवीने तिच्या खेळाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'बिग बॉस'मुळे जान्हवीच्या चाहता वर्गातही भर पडली. जान्हवीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी तिने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
जान्हवीने नुकतीच जयंती वाघधरेच्या आम्ही असं ऐकलंय या पॉडकास्टला हजेरी लावली होती. "लग्नानंतरही मी चाळीतच राहात होते. मी एका खूप साध्या घरात होते. आणि चूल आणि मूल एवढंच करत होते. मी लग्नानंतर सात वर्ष फक्त साडी नेसलेली आहे. हातात हिरव्या बांगड्या आणि टिकली हेच माझं आयुष्य होतं. साड्या पण अगदी गलिच्छ म्हणजे खोचलेली असायची. कारण दिवसभर घरातली कामं करायची असायची. भांडी घासायची, जेवण बनवायचं...सगळं करायचं. त्यामुळे साडी खोचलेली असायची. साडीचा पदरही खोचलेला असायचा. कामवाल्या बायका असतात तसं सेम माझं आयुष्य होतं", असं जान्हवी म्हणाली.
"त्यानंतर आता ही जान्हवी...हे माझं आयुष्य मी स्वत: बदललं आहे. आपल्याला एकच आयुष्य मिळतंय हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आपण पुन्हा जन्म घेऊ नाही घेऊ, कुठल्या अवस्थेत घेऊ आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आता जे देवाने दिलंय त्याचा आनंद घ्या. मी प्रत्येक स्त्रीला हेच सांगेन की कुटुंब आहे, मुलगा आहे सगळं ठिक आहे. पण, त्यात अडकू नका. स्वत:साठी जगा", असंही पुढे तिने सांगितलं.