'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखलं जातं. नुकतेच सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. यानंतर तिचे वजन काही प्रमाणात वाढलं. यातच सईने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी तिला वाढलेल्या वजनावरुन ट्रोल करण्यात आलं. तिला बॉडी शेमिंग आणि नकारात्मकता यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. यावर आता सईने एक पोस्ट शेअर केली आहे.
सईने पोस्टमध्ये लिहलं, 'एका बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीला लोक ट्रोल करतात यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अरे बाळाला जन्म दिल्यानंतर वजन कमी करण्याचा प्रवास पुन्हा सुरू करण्यापूर्वी तिला थोडा वेळ द्या. सी-सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमच्या शरीराचे 6 थर कापले जातात. यानंतर महिला काही उचलू शकत नाहीत, वाकू शकत नाहीत, खाऊ शकत नाही, असे अनेक निर्बंध लागतात'.
पुढे तिनं लिहलं, 'बाळाला जन्म दिल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. अशा काळात तुमचं मूल्यांकन केलं जाणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. असं ट्रोलिंग आश्चर्यचकित आहे. असे विचार ठेवणाऱ्यांची मला दया येत असून त्यांच्याबद्दल वाईट वाटतं आहे. देव तुमचं भलं करो. जर लोक थोडे अधिक समजूतदार, आदरणीय, दयाळू आणि आलोचना न करणारे असतील तर हे जग राहण्यासाठी एक चांगलं ठिकाण असेल'.
गर्भधारणे दरम्यान आणि बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीरात बदल होतात. सामान्य स्त्रियांच्या बाबतीत जे घडतं त्याचप्रमाणं सेलिब्रिटींच्या बाबतीतही कमी अधिक प्रमाणात तेच घडतं. बाळंतपण झाल्यावर करिअरमध्ये येणारा ब्रेक, त्यानंतर वाढणारे वजन या सगळ्यातून अभिनेत्रीनाही सामोरे जावे लागते. पण अभिनेत्रींंना त्यावरून ट्रोल केलं जातं.