'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीचा लावणी नृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्या दिलखेचक अदा आणि जबरदस्त लावणी पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे 'बिग बॉस मराठी' फेम योगिता चव्हाण आहे.
योगिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका कार्यक्रमात योगिताने हे लावणी नृत्य सादर केलं. मला प्रितीच्या झुल्यात झुलवा या गाण्यावर तिने डान्स केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. तिच्या लावणी नृत्याला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांनी उत्तम प्रतिसादही मिळत असल्याचं दिसत आहे. योगिताच्या या व्हिडिओवर तिचा नवरा आणि अभिनेता सौरभ चौगुलेने कमेंटही केली आहे.
दरम्यान, योगिता ही कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' मालिकेत दिसली होती. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. योगिताला या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती 'बिग बॉस मराठी ५'मध्ये सहभागी झाली होती. योगिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं.