'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मराठी टेलिव्हिजनवरील अत्यंत लाडका आणि प्रेक्षकांचा आवडता शो आहे. घराघरात हास्यजत्रेचे चाहते आहेत. या शोमधील कलाकार अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत हास्याची जणू जत्राच भरवतात. काही महिने ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा नव्याने हास्यजत्रा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता हास्यजत्रेत निक्की तांबोळी दिसणार आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये अनेक पाहुणे कलाकार हजेरी लावत असतात. या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी हास्यजत्रेत सहभागी होणार आहेत. सोनी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये निक्की तांबोळी आणि उषा नाडकर्णी दिसत आहेत. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
"बाई हा काय प्रकार", "हिला कोणी बोलवलं", "हिच्यामुळे एक एपिसोड बघणार नाही", "नक्की हा काय प्रकार", अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. उषा नाडकर्णी आणि निक्की तांबोळी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये सहभागी झाल्या आहेत. २७ जानेवारीपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.