बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे (Shiv thakare) अलिकडेच बिग बॉस १६ (Bigg Boss 16) मध्ये झळकला होता. या शोमुळे शिव घराघरात पोहोचला आहे. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायमच धडपड करत असतात. यात खासकरुन शिवच्या घराबाहेर चाहते मोठ्या संख्येने गर्दी करतात. इतकंच नाही तर सकाळापासून ते रात्र होईपर्यंत त्याच्या घराबाहेरच्या गर्दीचा ओघ काही कमी होत नाही. विशेष म्हणजे शिवसाठी भेटायला आलेल्या या चाहत्यांना त्याची आई आपुलकीने जेवू घालते. अलिकडेच एका मुलाखतीत शिवने हा खुलासा केला आहे.
"बिग बॉसनंतर खरंतर माझी आईच सेलिब्रिटी झाली आहे. हा शो संपल्यानंतर अनेक लोक लांबून लांबून खास तिला भेटण्यासाठी येतात. त्यामुळे आजही भेटायला आलेल्या लोकांना सांगते, की तुम्ही आमच्याकडे रहा. त्यांना मायेने जेवायला घालते. आजही मला भेटण्यासाठी माझ्या घराच्याबाहेर रात्री अडीच-तीन वाजेपर्यंत लोकांची गर्दी जमलेली असते.पण, माझी आई त्यांना कधीच उपाशी ठेवत नाही. ती कायम मला भेटायला आलेल्या लोकांना जेवू घालते आणि मगच त्यांना परत पाठवते", असं शिव म्हणाला.
पुढे तो म्हणतो,"अलिकडेच माझ्या आईने एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. तेव्हापासून तर तिचा स्वॅगच बदलला आहे. माझ्या सेटवरही अनेक जण मला येऊन सांगतात की, आम्ही तुझ्या आईचे फॅन आहोत.आणि,तिला भेटण्याची विनंतीही करतात. काही म्हणा, मराठी आयांची बातच काही और असते."
दरम्यान, बिग बॉसनंतर शिवच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. स्टारडम, यश, संपत्ती सारंकाही उपभोगत असतानाही शिवचे पाय जमिनीवर आहेत. त्यामुळेच त्याच्यातील हा साधेपणा चाहत्यांना विशेष आवडत असल्याचं पाहायला मिळतं.