'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यंदाच्या पर्वात सूरज चव्हाणने बाजी मराली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीपर्यंत पोहचला. 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन हा चांगलाच लोकप्रिय ठरला असून टीआरपीचे रेकॉर्ड मोडले आहेत. या सीझनमध्ये एकाचढ एक स्पर्धक सहभागी झाले होते. तर यंदाच्या सीझनची खास बाब म्हणजे लयभारी होस्ट रितेश देशमुख. या शोला रितेश देशमुखमुळे एक वेगळेच वलय प्राप्त करुन दिलं. पहिल्यांदा हॉस्ट म्हणून रितेश देशमुख यांने आपली छाप शोमध्ये पाडली.
रितेश देशमुखसाठी खुद्द 'कलर्स मराठी' वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड आणि लोकप्रिय मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी रितेशला मिठी मारलेला एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "एका शानदार पर्वाची सांगता झाली. भाऊ रितेश देशमुख तुमचे मनापासून आभार. एक ग्रेट माणसाची या निमित्ताने ओळख झाली, त्यांच्या जवळ जाता आलं. स्वामी कृपा". चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचा भरभरुन वर्षाव केला आहे.
रितेश देशमुखच्या होस्टिंगमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनने टीआरपीमध्ये अनेक रेकॉर्ड रचले. हा आतापर्यंतचा सर्वात जास्त टीआरपी मिळवलेला सीझन ठरला. या सीझनची चांगलीच चर्चा झाली. असं असतानाही शो १०० दिवसांऐवजी ७० दिवसातच संपवला. दरम्यान, दोन आठवडे रितेश हा भाऊच्या धक्क्यावर नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर ग्रँड फिनालेमध्ये आपण दोन आठवडे चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी विदेशात गेलो होते. त्यामुळे या शोमध्ये सहभागी होऊ शकलो नाही. मी सर्व महाराष्ट्राची माफी मागतो, असे रितेश देशमुख सांगितले आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.