रविंद्र मोरे
नेहा शितोळे हे नाव 'फू बाई फू' शोमुळे घराघरात पोहोचले. सॅक्रेड गेम्समध्येही नेहाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तिने पोस्टर गर्ल, पोपट, देऊळ, दिशा आणि सुरसपाटा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेहाने नुकताच बिग बॉस मराठी 2 च्या घरात प्रवेश केला आहे. बिग बॉस मराठी सिझन 2 ची विजेता तिच होणार असा आत्मविश्वास नेहाला आहे. घरात प्रवेश करण्यापूर्वी नेहाने रविंद्र मोरे यांच्याशी साधलेला हा खास संवाद
१) बिग बॉस मराठी या शोमध्ये तु जाते आहेस, या शोमध्ये तुला एंट्री मिळतेय असं जेव्हा तुला कळलं ,काय वाटतंय सध्या या शोविषयी ?- या क्षणी खूपच नर्व्हस वाटतेय. कारण बिग बॉसच्या घरात मी नर्व्हस एनर्जी घेऊन गेले तर जास्त काम करता येईल असं मला वाटतं.त्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट असण्यापेक्षा थोडासा नर्व्हसनेस असलेला चांगला. कारण आपण मग तिथे जास्त लक्ष देऊन चांगली खेळी करु शकतो.
२) बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यानंतर तिथे कसं राहायचं, वागायचं याचं काही नियोजन तू केलं आहेस का ?- खरं सांगू का असं काहीही नियोजन मी केलेलं नाहीये. घरात गेल्यानंतर ,तिथलं वातावरण बघीन, काही माणसं ओळखीची असतील ,काहीजणांची नव्याने ओळख होईल, त्यांचे स्वभाव त्यांची वागण्याची पध्दत ह्यावरच मी घरात कसं वागायचं,कसं राहायचं याची दिशा ठरवेन .
३)रिअॅलिटी शोबद्दल नेहमी असा सूर असतो की हे शोज पब्लिसिटी स्टंट किंवा टीआरपी वाढवण्यासाठी केले जातात.. याबाबत तुझं मत काय आहे ?- नाही, मला नाही असं वाटत. कारण मी या पूवीर्ही एक रिअॅलटी शो केला होता. त्यामुळे मला माहिती आहे की, एखाद्या रिअॅलिटी शो मध्ये किती रिअॅलिटी असते आणि खरंच संबंधीत स्पर्धकांना त्या टास्क मधून जावे लागते. त्या सगळ्या त्रासातून जावे लागते. आणि मुळात आपण पाहतो की, या घरात २४ तास कॅमेरे असतात आणि ते आपल्या प्रत्येक गोष्टी टिपत असतात. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही आपण अजिबात तिथे खोटे वागू शकत नाहीत. जे काही खरे आहे ते बाहेर पडतच, आणि हा काळ जो आहे १०० दिवसांचा हा एवढा मोठा काळ आहे, तर कोणीही कितीही काहीही खेळ करण्याचा प्रयत्न केला तर एका पॉइंटनंतर जे खरं आहे ते बाहेर पडणारच.
४) महेश मांजरेकर हे या शो चे होस्ट आहेत ..सलग दुसरा सिझन बिग बॉसचा महेशजी होस्ट करतायत.. काय सांगशील त्यांच्याबद्दल - मी आतापर्यंत महेशजींसोबत कधीच काम केलं नाही. मी पहिल्यांदाच खरंतर त्यांना बिग बॉसमुळे भेटणार आहे. महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. त्यांचा अनुभवही खूप जास्त आाहे. मुळात ते दिग्दर्शक असल्याने त्यांना माणसांची चांगली पारख आहे. त्यामुळे त्यांचा अनुभवाचा आम्हांला बिग बॉसच्या घरात वागताना नक्कीच फायदा होणार आहे.
५) तू हा शो जिंकशील का ? काय वाटतंय याबद्दल तुला ?- हो, नक्कीच. मी याबाबत तशी काही तयारी केली नाही. मात्र मनाची तयारी केली आहे की, इथे आपल्याला १०० दिवस राहायचे आहे. यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय. आतापर्यंत जी काही कामे केली आहेत ती प्रामाणिकपणे केली आहेत आणि ती लोकांना आवडली आहेत. त्यामुळे मी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर खरी नेहा शितोळे कशी आहे हे कळल्यानंतर रसिक मायबाप प्रेक्षक नक्कीच याचा सकारात्मक प्रतिसाद देतील आणि भरभरुन मतंही देतील आणि त्या जोरावर नक्की जिंकेल.