Bigg Boss Marathi Season 3 Elimination: ‘बिग बॉस मराठी 3’ अंतिम टप्प्यात आला असताना घरातून कोण बाद होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना होतीच. काल ‘चावडी’ रंगली आणि बिग बॉस मराठीच्या घरातून आणखी एका सदस्याने निरोप घेतला. होय, यंदाच्या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धक सोनाली पाटील (Sonali Patil ) घरातून बाद झाली. जवळपास 90 दिवसांचा तिचा प्रवास संपुष्टात आला.
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी शनिवारच्या चावडीत नॉमिनेट झालेल्या चार स्पर्धकांसाठी बॅग्स पाठवल्या होत्या. विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते. ज्या स्पर्धकाला त्याची बॅग परत मिळणार नाही तो घरातून बाहेर जाईल, असं मांजरेकर यांनी सांगितलं होतं. सोनालीला तिची बॅग परत मिळाली नाही आणि तिला घरातून बाहेर जावं लागलं.
सोनाली पाटील घरातून बाद झाल्याने चाहत्यांसकट खुद्द शोचे होस्ट महेश मांजरेकरांनाही धक्का बसला. कारण सोनाली फिनालेची दावेदार मानली जात होती. टॉप 5 मध्ये ती असणार, असं अनेकांना वाटलं होतं. पण सोनाली बाद झाली. तिच्या नावाची घोषणा होताच मांजरेकरांनीही आश्चर्य व्यक्त केलं. हे या सीझनमधील सर्वात धक्कादायक एलिमिनेशन असल्याचं ते म्हणाले. सोनाली घराबाहेर झाली आणि घरातील सर्वच स्पर्धक भावुक झालेत.
सोनाली टिकटॉक गर्ल म्हणून ओळखली जाते. ती कोल्हापूरची आहे. तिने ‘वैजू नंबर वन’ मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण केले होते. सोनालीने बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच आपली वेगळी छाप सोडली होती. कोल्हापुरी कडक लहेजामुळे ती सर्वांपेक्षा वेगळी ठरली होती. विशाल निकम आणि विकास पाटील यांच्यासोबतची तिची मैत्री विशेष चर्चेत राहिली. सरतेशेवटी या दोघांसोबतच्या वादांमुळेही ती चर्चेत होती.
सोनाली बाद झाल्यानंतर ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये आता 6 स्पर्धक राहिले आहेत. यामध्ये विशाल निकम, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे, मीनल शाह, जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथ यांचा समावेश आहे. या सहा जणांपैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकतो, याची चाहत्यांना प्रतीक्षा असणार आहे.