Jay Dudhane : स्टॅंडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी त्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला. एका स्टॅंडअप कॉमेडी शोमध्ये त्याने केलेल्या वादग्रस्त विधानाने त्याच्या अडचणीत वाढ झाली. या कॉमेडी शोची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मुन्नावर नेटकऱ्यांसह राजकीय मंडळींच्या निशाण्यावर आला. कोकणी माणसांबद्दल त्याने केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणही चांगलच तापलं होत.
यावर आता 'बिग बॉस मराठी- ३' फेम अभिनेत्याने केलेली संतप्त पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. बिग बॉस फेम अभिनेता जय दुधाणे याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्याने बिग बॉस( हिंदी) सीझन १७ विजेता कॉमेडियन मुन्नावर फारुकीवर टीका केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यात जयने म्हटलंय, "यांना आणखी चढवा, म्हणजे..." असं सूचक कॅप्शन त्याने लिहलं आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्याने संताप व्यक्त केला आहे.
मुंबईतील एका कॉमेडी शोमध्ये त्याने वापरलेल्या अपशब्दामुळे मनसे, शिवसेना तसेच भाजप या पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्याच्यावर अनेक स्तरातून टीकाही करण्यात आली. शिवाय सोशल मीडियावर मुन्नावरला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. घडलेल्या प्रकाराबद्दल मुन्नावरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी देखील मागितली.
काय म्हणाला मुन्नावर फारुकी?
"काही दिवसांपूर्वी मुंबईत एक शो झाला होता. त्याशोमध्ये मी प्रेक्षकांसोबत संवाद साधला. त्यादरम्यान बोलताना मध्ये कोकणचा विषय निघाला. तळोजात कोकणातील बरेच लोक राहतात हे मला माहित होतं. कारण तिथे माझे मित्र राहतात. बोलण्याच्या नादात माझ्या तोंडून असं एक वाक्य गेलं ज्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे लोकांना असं वाटतंय की मी कोकणची थट्टा केलीय. एक स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून कोणी दुखी होऊ नये असं मला वाटतं. मी मनापासून माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र" असं मुन्नवरने म्हटलं आहे.