Join us

‘Bigg Boss Marathi 3’मधून आणखी एक गडी बाद, पहिल्यांदा शॉकिंग मिड-वीक एलिमिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 10:15 AM

Bigg Boss Marathi 3  Mid  Week Elimination : मांजरेकरांनी उत्कर्ष सेफ असल्याचं सांगितलं आणि मग मीरा वा मीनल अशा दोघीच उरल्या. या क्षणाला मीरा आणि मीनल एकमेकींचा हात घट्ट धरुन उभ्या होत्या. अखेर...

Bigg Boss Marathi 3  Mid  Week Elimination :  ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि अशात घरातून आणखी एक शॉकिंग एलिमिनेशन झालं. होय, बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच मिड-वीक एलिमिनेशन झालं आणि मीरा जगन्नाथ (Mira  Jagannath)शोमधून बाद झाली. मीरा घराबाहेर पडल्याने आता ‘बिग बॉस मराठी 3’चे टॉप 5 स्पर्धक घरात उरले आहेत. यात विशाल निकम, नीलम शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदो आणि जय दुधाणे अशा पाच जणांचा समावेश आहे.

 विशाल निकमने ‘तिकिट टू फिनाले’ टास्क जिंकत कधीच ग्रँड फिनालेमध्ये आपली जागा पक्की केली होती. त्यामुळे मीरा, विकास, जय, मीनल आणि उत्कर्ष या पाच मधून कोणाचा पत्ता कटणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 

बिग बॉसने पाचही स्पर्धकांना गार्डन एरियामध्ये बोलावलं. गार्डनमधील एका पटावर पाच जणांना उभं राहायला सांगितलं गेलं. सरप्राईज बॉक्सचा चौकोन या खेळात पाचही जणांसाठी वेगवेगळ्या चौकोनात काही संदेशपत्रं होती.  प्रत्येक जण एक-एक चौकोन पुढे-मागे जात एक एक संदेशपत्र वाचत होतं. जय दुधाणे सर्वात आधी सेफ झाला आणि ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला. पाठोपाठ विकास पाटील सेफ झाला आणि अचानक  महेश मांजरेकर यांनी एण्ट्री घेतली. उत्कर्ष, मीनल आणि मीरा यापैकी कोण बाद होणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना मांजरेकरांनी उत्कर्ष सेफ असल्याचं सांगितलं आणि मग मीरा वा मीनल अशा दोघीच उरल्या. या क्षणाला मीरा आणि मीनल एकमेकींचा हात घट्ट धरुन उभ्या होत्या. अखेर, मीरा जगन्नाथ एलिमिनेट झाल्याचं मांजरेकरांनी जाहिर केला आणि सर्वांच्याच अश्रूचा बांध फुटला. ग्रँड फिनालेच्या आधीच मीराचा घरातील प्रवास संपला.

मीराला निरोप देताना मांजरेकरांनी घरातलं वातावरण आणखीच भावुक केलं. मीराशी अनेक वर्ष संपर्क न ठेवणा-या तिच्या आईबाबांचा व्हिडीओ त्यांनी दाखवला. मीरा आम्हाला तुझा अभिमान वाटतो, असं आईबाबा म्हणाले आणि मीरा ढसाढसा रडली. तिच्यासोबत इतर स्पर्धकांनाही अश्रू अनावर झालेत.आता विशाल, विकास, जय, उत्कर्ष आणि मीनल हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. या पाच जणांपैकी ‘बिग बॉस मराठी 3’च्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरतं, हे पाहणं  औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतून मीराने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये तिने संजनाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत मोमोची भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली. या भूमिकेमुळे तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून मीराचं अनेकांसोबत वाद झालेत. मांजरेकरांनी सर्वाधिक शाळा कुणाची घेतली तर मीराची. पण मीरा सर्वांना पुरून उरली होती.

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर