Join us  

Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस' मराठीच्या चौथ्या सीझनची धडाक्यात सुरुवात, 'देवमाणूस' फेम अभिनेत्री पहिली स्पर्धक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 7:23 PM

Bigg Boss Marathi 4: एक घर...१०० दिवस...१६ स्पर्धक, २४ तास तुमच्यावर शेकडो कॅमेरांची नजर आणि याच आधारावर कोट्यवधी प्रेक्षकांकडून केली जाणार तुमची पारख...असा आगळावेगळा भन्नाट रियालिटी शो म्हणजे Bigg Boss!

एक घर...१०० दिवस...१६ स्पर्धक, २४ तास तुमच्यावर शेकडो कॅमेरांची नजर आणि याच आधारावर कोट्यवधी प्रेक्षकांकडून केली जाणार तुमची पारख...असा आगळावेगळा भन्नाट रियालिटी शो म्हणजे Bigg Boss! हिंदीत हा शो सुपरहिट झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी मराठीतही सुरू झाला. मराठी प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद दिला. आज बिग बॉस मराठीचं चौथं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. शोचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत आज बिग बॉस मराठी सीझन-४ चा ग्रँड प्रीमअर सुरू आहे आणि यंदाच्या सीझनमध्ये घरात पहिलं पाऊल ठेवण्याची संधी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) हिला प्राप्त झाली आहे. 

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही गेली १४ वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. 'झी मराठी'वरील 'देवमाणूस' मालिकेत तेजस्विनी आमदार बाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याच भूमिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिनं चिनू, गुलदस्ता यांसारख्या चित्रपटातही काम केलं आहे. घरात दाखल होण्याआधीच तेजस्विनीला पहिली ड्युटी 'बिग बॉस'नं दिली आहे. 'बिग बॉस'च्या घरात तेजस्विनीला स्वयंपाक घराची जबाबदारी मिळाली आहे.  

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची थीम 'ऑल इज वेल'वर आधारित आहे. या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. प्रीमियर आजपासून म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. आता पुढचे १०० दिवस हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. बिग बॉस मराठी ४ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. तर वीकेंडला शनिवार आणि रविवारी ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. ज्यात महेश मांजरेकर आपल्या अनोख्या स्टाइलमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहेत. याशिवाय हा शो तुम्हाला वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येणार आहे.

बिग बॉस मराठीचे आतापर्यंत तीन सीझन झाले आहेत. मेघा धाडे पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती. तर दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरेनं बाजी मारली होती. तिसऱ्या सीझनमध्ये विशाल निकमनं ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. 

टॅग्स :बिग बॉस मराठी