Akshay Kelkar Post On Badlapur Case: बदलापुरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. आरोपीत व्यक्तीला कठोर शिक्षा द्या अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. बदलारपुरच्या एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुरडींवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ अनेक राजकीय मंडळींसह मनोरंजन विश्वातील कलाकारही आवाज उठवत आहेत. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण व्यक्त होताना दिसत आहेत.
अशातच 'बिग बॉस मराठी सीझन ४' चा विजेता अक्षय केळकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टद्वारे अभिनेत्याने बदलापूर प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात अक्षय केळकरने एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अक्षयने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्याने या पोस्टमध्ये लिहलंय, "बंगालमध्ये ती एक डॉक्टर होती. बदलापुरात शिशुवर्गामध्ये जाणाऱ्या लहानग्या चिमुरड्या मुली आहेत. कळव्यातील ती एक लहान आणि गतिमंद मुलगी आहे. किती ठिकाणी आता म्हणायचं all Eyes? आणि कसं द्यायचं तिला रक्षेचं वचन? कुठल्या तोंडाने बंधंन बांधून घ्यायची तिच्याकडून?
पुढे अक्षयने म्हटलंय, "अत्याचार करणारा जात, धर्म, देश,भाषा, वय, पेहराव,शिक्षण, काळ,वेळ काही म्हणजे काहीच बघत नाही. अरे ती जिवंत आहे की मेली आहे हे ही बघत नाही. पण अशा विकृतीला शिक्षा होताना मात्र हजार मुद्दे आडवे येतात. कठोर शिक्षा तर द्याच आणि आता सगळ्यांसमोर द्या!" असं लिहित अक्षयने प्रशासनासमोर सवाल उपस्थित केला आहे.
याखेरीज पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्याने लिहलेल्या कॅप्शनने देखील नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे. त्यात अभिनेत्याने लिहलंय की, "कुठे वासना होती, कुठे विकृती दिसली तर अजून कुठे काही छुपा हेतू काहीही कारण असो, कोणीही कर्ता असो, त्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की कोणी स्वप्नातही परत असा विचार करणार नाही". अशा पद्धतीने अक्षय केळकरने सोशल मीडियावर आपलं परखड मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.