Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चा रंगलेली आहे. सध्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. सर्वच स्पर्धक कॅप्टन्सीसाठी लढत आहेत. याच दरम्यान गुलीगत फेम सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीचा सीझन जिंकण्याचा निर्धार केला आहे. सूरजने आपल्या हटके स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. झापूक झुपूकवाले त्याचे डायलॉग सर्वांनाच आवडतात.
सूरजने आता घरातील सदस्यांना त्याने त्याचा पहिला मोबाईल कसा घेतला? याबाबत सांगितलं आहे. अभिजीत, पॅडी आणि संग्राम हे बसलेले असतात. त्यावेळी सूरज त्यांना म्हणतो की, "हजार नाही तर दोनशे रुपये मिळायचे." पॅडी म्हणतो, "बस एवढेच... किती वेळ काम असायचं?" त्यावर सूरजने "कधी पहाटेपर्यंत असायचं" सांगितलं. "तेव्हा दिवसरात्र काम करून फक्त दोनशे रुपयेच मिळायचे का?" असं पॅडीने विचारताच सूरज हो म्हणाला.
सूरजने सांगितलं की, "आमचा मंगळवारी बाजार असायचा. तेव्हा दर आठवड्याचा पगार मिळतो. आठवड्याला १२०० रुपये कमवायचो. त्यावेळी सेकंड हँड मोबाईल घेतला. २ हजार रुपयांना विकत घेतला. डिस्प्ले गेला होता... कार्ड टाकलं, गोरीला ग्लास बसवली. माझा पहिला मोबाईल होता. त्याला मी काय करायचो माहितीय का? आमच्या आईची साडी घ्यायचो आणि त्याची काच पुसायचो."
"एक फडका घेऊन त्यात गुंडाळून ठेवायचो. नवीन वस्तू आली की किती आनंद असतो. थोडा वेळ फोन बघायचो आणि परत ठेवायचो." बिग बॉसच्या घरामध्ये गुलीगत फेम सूरज चव्हाणची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच्या वागण्यामुळे तो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. आता मात्र तो कोणालाही न घाबरता हटके स्टाईलने सर्वांना गोलीगत चीत करताना दिसून येत आहे.