Bigg Boss Marathi Season 5 And Suraj Chavan : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता स्पर्धकांच्या वागण्यामुळे चर्चेत आला आहे. वादांमुळे तो सध्या गाजत आहे. अशातच बिग बॉसने घरातील सदस्यांना एक जादुई फोन दिला. या फोनच्या मदतीने ते आपल्याला सोडून गेलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधू शकतात. शेवटचं काही सांगायचं राहिलं असेल तर ते सांगू शकतात. स्पर्धकांनी आपल्या जवळच्या लोकांना फोन करून मनातील भावना व्यक्त केल्या. सर्वांसाठीच हा एक भावूक करणारा क्षण होता.
गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणने देखील आपल्या आई-वडिलांना यावेळी फोन केला. सूरजचे आई-बाबा आता या जगात नाहीत. आई-आप्पा तुमची खूप आठवण येते, मी तुम्हाला खूप मिस करतो, तुम्ही मला सोडून का गेलात? असं म्हणत सूरज ढसाढसा रडला. "आई- आप्पा तुमची आठवण येतेय. तुम्ही मागचा पुढचा विचार का नाही केला. तुमच्या बाळाचा, माझा विचार का नाही केला?"
"कोण त्याला सांभाळेल? कोण त्याच्याकडे बघेल? असं कसं काय तुम्ही मला सोडून गेलात? एकटं पडलंय तुमचं बाळ. आई कशी गं सोडून गेलीस तू मला. लय आठवण येतीय तुमची. मला रक्ताच्या उलट्या व्हायच्या. कसंतरी व्हायचं. तुझी आठवण यायची. आता तुमच्या बाळाकडे कोण बघणार आई. आई तू का गेलीस... आता किती चांगलं झालंय सगळं. आपण दोघं किती आरामात राहिलो असतो."
"आता तू नाहीस तर मी किती एकटा पडलो आहे आई. असं सोडून जायचं होतं तर मला जन्मच द्यायचा नव्हता. जीवनात यायचं नव्हतं. मला दम लागतो, मला किती त्रास होतो. मला जवळ घ्यायला कुणी नाही. तू माझ्या डोक्यावरून हात फिरवायची, मला किती बरं वाटायचं. पण डोक्यावरून हात फिरलायलाच कुणी नाही. आता मला कुणीच नाही. तुझी खूप जास्त आठवण येतेय..." असं सूरज चव्हाणने म्हटलं आहे.