बिग बॉस मराठीच्या सीझन ५ मध्ये सध्या धमाल पाहायला मिळत आहे. १६ स्पर्धकांचे खरे चेहरे आता हळूहळू समोर येत आहेत. अनेक सदस्यांमध्ये टोकाचा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. अशातच 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणची हटके स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. निक्की तांबोळी सूरजला तिचं मेकअपचं सामान वॉशरुममध्ये घेऊन जाण्यास सांगते. त्यावर सूरजने तिला आपला स्वॅग दाखवत तिची बोलती बंद केली आहे.
निक्कीला मेकअप करण्यासाठी वॉशरुममध्ये जायचं असतं. त्याचवेळी सूरज तिथे उभा असतो. तेव्हा निक्की त्याला "माझं मेकअपचं सामान धर ना रे हे प्लीझ, चल ना हे एक बाथरूममध्ये घेऊन... पर्सनल आहे, घराचं नाही. चल ना माझ्यासोबत..." असं म्हणते. त्यावर सूरजने तिला हे काम करण्यास नकार दिला. "तुझी कामं तूच करायला पाहिजे. पर्सनल कामच तुझं तू स्वत: करायला पाहिजे. घराचं काम असतं ना... तर मी लगेच चल असं म्हटलं असतं" असं म्हटलं आहे.
धनंजय पोवार यांनी देखील यावर सूरज चव्हाणचं यासाठी कौतुक केलं आणि 'हे खूप महत्त्वाचं बोललास' असं म्हटलं. तसेच निक्कीला देखील त्यांनी 'पर्सनल काम तुझं तू स्वत: करायला हवंस' असं सांगितलं. हे घडलं तेव्हा वर्षा उसगावकर देखील तिथेच होत्या. त्यांनी देखील सूरजला साथ देत 'तू तुझ्या भुमिकेत आलास' असं म्हटलं. या सर्व प्रकारावर निक्की तांबोळी "बाई..." अशी तिची नेहमीचीच आणि आवडीची प्रतिक्रिया देऊन तिथून निघून गेली.
"मी नसतो कोणालाच भीत, मीच आहे गुलीगत टॉपचा किंग"
सूरज चव्हाणने विशेष प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आता मात्र तो कोणालाही न घाबरता हटके स्टाईलने सर्वांना गोलीगत चीत करताना दिसून येणार आहे. प्रोमोमध्ये सूरज निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे. त्यावर निक्की तांबोळी सूरजला म्हणते,"तू मला चॅलेंज करतोस ना... तू विचार पण करू शकत नाही की तू माझं असं रुप पाहशील". त्यानंतर कन्फेशन रुममध्ये 'बिग बॉस' सूरजला बोलावतात आणि म्हणतात, "सूरज न घाबरता खेळा". यानंतर सूरजलाही मोठा धीर मिळाला आणि त्याने निर्भीडपणे "मीच आहे आता गुलीगत टॉपचा किंग" असं म्हटलं आहे.