Join us  

दीड महिन्यानंतर लाडक्या लेकीला समोर पाहताच आर्याच्या आईला अश्रू अनावर; नेटकरी म्हणतात, 'जाधवांची वाघीण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:57 AM

'बिग बॉस मराठी' च्या घराबाहेर पडल्यानंतर आर्या जाधव तिच्या मुळगावी अमरावतीला परतली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5:  'हसल-२' या कार्यक्रमात रॅप सॉंगने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अमरावतीकर आर्या जाधव ही 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात जवळपास ती सात आठवडे टिकून होती. पण, एका टास्क दरम्यान  निक्कीवर हात उगारल्याने आर्याला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखसमोर मोठी शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे आर्याला 'बिग बॉस'ने थेट बाहेरचा रस्ता दाखवला. या घडल्या प्रकारावर नेटकऱ्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. जवळपास दीड महिने ती 'बिग बॉस'च्या घरात आपल्या दमदार खेळीमुळे टिकून राहिली. आता आर्या तिच्या मुळगावी अमरावतीला परतली आहे. त्याच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आपल्या दमदार खेळीने 'बिग बॉस'चं घर दणाणून सोडणारी आर्या जाधव घराच्या बाहेर आल्यानंतर व्यक्त होताना दिसते. अशातच सोशल मीडियावर आर्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये रॅपर आर्या तिच्या आईची गळाभेट करताना दिसते आहे. शिवाय लाडक्या लेकीला दीड महिन्यानंतर डोळ्यासमोर पाहताच तिच्या आईला अश्रू अनावर होतात. आर्याला समोर बघून तिची आई तिला मिठी मारते आणि ढसढसा रडू लागते. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावुक झाले आहेत. 

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच काल आर्या अमरवतीला गेली. तिथे तिच्यासाठी खास रॅली काढण्यात आली. अनेक चाहत्यांनी तिच्या रॅलीत उपस्थित राहून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. काही चाहते तर भावूकही झाल्याचं पाहायला मिळालं.  

'सेलेब्रिटी प्रमोटर्स' या इन्स्टाग्राम अकाउंवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओवर आर्याला पाठिंबा देण्यासाठी नेटकरी देखील व्यक्त होताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने म्हटलंय, "जाधवांची वाघीण हाय ती" तर आणखी एकाने आपली प्रतिक्रिया देत लिहलंय, "आर्या तू खरंच खूप भारी आहेस" असं म्हणत चाहते आर्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया