Join us  

Exclusive : महेश मांजरेकर की रितेश देशमुख? कोणाच्या होस्टिंगने आर्या जाधव प्रभावित; उत्तर देत म्हणाली..,

By सुजित शिर्के | Published: September 21, 2024 12:58 PM

'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आर्या जाधवने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'बिग बॉस'च्या घरामध्ये घडलेल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. 

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून रॅपर आर्या जाधवला निक्कीवर हात उगारल्याने भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखसमोर मोठी शिक्षा सुनावण्यात आली. आर्याला 'बिग बॉस'ने थेट बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे अमरावतीची रॅपर आर्या जाधवचा 'बिग बॉस'च्या या पर्वातील प्रवास इथेच थांबला. मराठी मनोरंजन विश्वात हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर आल्यानंतर आर्याने नुकतील 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत आर्या जाधवला महेश मांजरेकर की रितेश देशमुख यांच्यापैकी कोणाचं सूत्रसंचालन तुला आवडतं? तसंच 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत असते तर त्याचा निक्कीवर किती परिणाम झाला असता? असं तुला वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आर्या म्हणाली, "मला असं वाटतं, मला माझ्यासाठी तर रितेश दादाच चांगला वाटला. कारण अशी गोष्ट आहे ना की त्या सीझनमध्ये मी होती, आणि आता महेश सर असते तर त्यांनी सगळ्यांची वाट लावली असती. ते माझ्या छोट्या-छोट्या गोष्टींवर देखील बोलले असते आणि ते माझ्यावर रागावलेही असते. शिवाय मी त्यांच्या रागवण्याने घाबरली असती. पण, नक्कीच निक्कीवर त्याचा चांगला परिणाम झाला असता". 

पुढे आर्या म्हणाली, "त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी निक्कीला कठोर शिक्षा दिली होती की तू स्टूलवर बस, असं त्यांनी सांगितलं होतं. मुलींसोबत चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळे निक्कीला बजावलं होतं. पण, तिला या गोष्टींचा काहीचं फरक पडत नाही. शिवाय तिला कोण काही बोलतंय याचा सुद्धा काहीच फरक पडत नाही. मग त्या जागी महेश सर असते किंवा रितेश सर, ती कोणाचं ऐकून घेत नाही. त्याचा निक्कीवर काहीच परिणाम झाला नसता. ती तिचं चुकीचं पद्धतीने खेळणं चालूच ठेवते". असंही आर्या पुढे म्हणाली. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमहेश मांजरेकर रितेश देशमुखटेलिव्हिजनसेलिब्रिटी