बिग बॉस मराठी सीझन ५ (Bigg Boss Marathi 5) संपल्यानंतर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आणि सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची अखेर भेट झाली. अंकिताने सूरजच्या मोढवे गावी जात त्याची भेट घेतली. मात्र यावेळी सूरज चक्क एक तास उशिरा आला. अंकिता आणि दाजी भेटायला येत आहेत हे माहित असूनही तो घराबाहेर होता. अंकिताने तिच्या व्लॉगमधून संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
अंकिता वालावलकरचं 'कोकण हार्टेड गर्ल' हे युट्यूब चॅनल आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणची भेट घेतली. यात ती म्हणते, "आम्ही सूरजच्या घरी पोहोचलो. त्याच्या बहिणीने आमचं छान स्वागत केलं. पण आम्ही पोहोचल्यानंतर सूरज एक तासानंतर आम्हाला भेटला. आम्ही तुझ्या गावात पोहोचलो आहे हे सांगूनही तो पोहायला गेला होता. घरी पोहोचल्याचं सांगितल्यावर तो अंघोळीला गेला. खरंतर त्याला आम्ही आधीच कल्पना दिली होती की आम्ही पोहोचलाय. तो तासाभराने घरी आला आणि आम्हाला न भेटताच आत गेला. मी बिग बॉसमध्ये ज्या सूरज चव्हाणला भेटले तो हा सूरज नाहीए. त्याला इथे जसं सांगितलं जातंय तसं तो वागतोय म्हणूनच मी हे सगळं इथे सांगत आहे. "
अंकिता सूरजला भेटली याचे व्हिडिओही नंतर सूरजच्या अकाऊंटवरुन गायब झाले होते. हे सगळं सूरजच्या मागे कोणीतरी करतंय असा अंकिताला संशय आहे. वेळोवेळी तिने याबाबत सांगितलंही आहे. सूरजने नंतर इन्स्टाग्राममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्याचं सांगत माफी मागितली.
सूरज चव्हाण लवकरच 'झापूक झुपूक' सिनेमात दिसणार आहे. केदार शिंदे त्याच्यासाठी सिनेमा बनवत आहेत. बिग बॉस जिंकल्यानंतर सूरजचा चाहतावर्ग आणखी वाढला आहे. बारामतीला त्याच्या गावी सूरजच्या घरी सतत गर्दी असते याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.