Bigg Boss Marathi Season 5: सध्या मराठी मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन चांगलाच गाजतो आहे. यंदाच्या पर्वामध्ये कीर्तनकारांपासून ते सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर यांची वर्णी लागली आहे. अशात या सीझनमध्ये गुलीगत फेम सूरज चव्हाणची जोरदार चर्चा रंगली आहे. साधेपणा आणि आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सूरजने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मोबाईलच्या साहाय्याने व्हिडीओ बनवून सूरजने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. त्याच्या लोकप्रियतेमुळे बिग बॉसच्या पाचव्या पर्वामध्ये त्याला झळकण्याची संधी मिळाली. दरम्यान, बिग बॉसच्या घरामध्ये रिलस्टार सूरजने त्याच्या बालपणीच्या कठीण काळाबद्दल सांगितलं.
सध्या सोशल मीडियावर सूरज चव्हाणचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सूरजने वडिलांचं छत्र हरपल्यानंतर त्याच्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. यंदाच्या बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सूरजला पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. काहींनी तर त्याला बोलण्यावरून हिणवलं. त्याला ट्रोलही केलं. खरंतर सूरजचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता. असंख्य आव्हानांना सामोरं जाऊन त्याने हा पल्ला गाठला आहे.
या व्हिडीओमध्ये सूरज म्हणतो, "माझ्या वडिलांच मी लहान असतानाच निधन झालं. वडिलांच निधन झालं तेव्हा मी गोट्या खेळत होतो आणि कुणीतरी येऊन सांगितलं की तुझे अप्पा गेले. तेव्हा मी पळत पळत घरी गेलो. वडील गेले असतानाही मला रडायलाच आले नाही. माझ्या डोळ्यातूनच पाणी आले नाही. मी त्यावेळी खूप लहान होतो. त्यामुळे गावातील लोकांनी मला नावं ठेवली". व्हिडीओमध्ये आपल्या वडिलांविषयी सांगताना सूरज भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आपल्या वडिलांविषयी सांगताना सूरज म्हणतो, "माझ्या अप्पांनी सढळ हाताने प्रत्येकाची मदत केली. एखादा गरीब माणुस जरी दारात आला तरी भरल्या ताटावरून उठून त्यांनी त्याला मदत केली. स्वत: उपाशी राहून समोरच्या माणसाला माझा बाप जेवायला देत असे. असे माझे वडील होते. आता या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं, मला खाण्याची इच्छा देखील होत नाही. आई-वडिलांची आठवण येते".