Bigg Boss Marathi Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन चांगलाच चर्चेत आला आहे. पहिल्या दिवसापासूनच हा सीझन प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे या सीझनचा होस्टही लयभारी आहे. नवा होस्ट, तगडे स्पर्धक असेल्या मनोरंजनाच्या बॉसने टीआरपीचे तर रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. सुपरस्टार रितेश देशमुख आहे. रितेश भाऊ आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवत आहे. नुकतंच पार पडलेल्या 'विकेंड का वार' रितेश नव्हता. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राने आपल्या लाडक्या भावाची आठवण काढल्याचं पाहायला मिळालं.
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील रितेश दुवा आहे. 'भाऊच्या धक्क्या'वरील त्याच्या सादरीकरणाचं जगभरात भरभरून कौतुक होत आहे. पण या वीकेंडला मात्र व्यस्त चित्रीकरणामुळे त्याला 'भाऊचा धक्का' करता आला नाही. पण, 'शो मस्ट गो ऑन' म्हणत 'बिग बॉस मराठी'च्या घरातला कल्ला सुरू राहिला. शनिवारी पार पडलेल्या 'महाराष्ट्राचा धक्का'ला महाराष्ट्रातील पत्रकारांनी तर रविवारी सुप्रिया पिळगांवकर, स्वप्निल जोशी आणि अभिनयसम्राट अशोक सराफ यांनी हजेरी लावली. 'बिग बॉस मराठी'च्या घरात गेलेल्या या सर्वच कलाकारांना रितेशची खूप आठवण आली.
रितेशने 'बिग बॉस मराठी'चे हे पाचवे पर्व एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. महाराष्ट्रातील घराघरांतील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात रितेश यशस्वी झाला आहे. 'बिग बॉस मराठी'ला त्याने नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. रितेश हा परिस्थितीनुसार कधी कोणत्या सदस्याचा मित्र होतो तर कधी कोणाचा गुरू, कोणासोबत मस्ती करतो तर कोणासोबत लय भारी दोस्ती. कोणाचं काही चुकलं तर त्यांची शाळाही घेतो तर कोणाची पाठही थोपटतो, तर कधी शाबासकीही देतो. रितेश भाऊच्या या अनोख्या अंदाजाचं 'बिग बॉस' प्रेमी प्रशंसा करताना दिसून येत आहेत.