Join us

"मी शिवसेनेत प्रवेश केलेला पण नंतर...", अभिजीत सावंतने केलेलं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 08:45 IST

Abhijeet Sawant : गायक अभिजीत सावंत सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहे.

२००४ साली 'इंडियन आयडॉल'(Indian Idol)च्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) ठरला होता. या शोमुळे मराठमोळा अभिजीत चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर आता तो लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)मध्ये पाहायला मिळत आहे. या शोमध्ये तो चांगलाच चर्चेत देखील आहे. अभिजीतने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्याने अनेक किस्से सांगितले. दरम्यान त्याने या मुलाखतीत त्याने शिवसेनेत प्रवेश केल्याचे कबूल केले.

अभिजीत सावंत म्हणाला की, हो. मी शिवसेनेत प्रवेश केला होता. मला ते सर्व लोक आवडायचे. खास करून आदित्य ठाकरे. त्यावेळेला तो समविचारी माणूस वाटायचा. कारण ते तरूण होते. कविता करायचा. त्यांना कलेची जाण आहे. त्यांच्यासोबत बसल्यावर कळायचं की ते एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. लहान आहे पण खूप ज्ञान आहे. बोलणं खूप मॅच्युअर आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत मजा यायची. 

तो पुढे म्हणाला की, महत्त्वाची गोष्ट ही होती की, मी धारावीत राहायचो. संपूर्ण आयुष्य तिथे काढले. आम्हाला शाळेसाठी बसने जाताना देखील नाला पार करून पलिकडे जावे लागायचे. माझी सोसायटी चांगली होती. पण दुध, भाजी आणि मासे जरी आणायला जावं लागलं तर सोसायटीच्या बाहेर जावे लागायचे. तिथल्या समस्या जवळून पाहिल्या होत्या. म्हणून मला वाटायचे की ज्या लोकांनी इतकं प्रेम दिले आणि माझ्यासाठी एवढं सगळं केलंय, त्यांच्यासाठी मी पण काही चांगलं करू शकलो तर समाधान मिळेल. पण नंतर मला कळलं समाजसेवेपेक्षा इथे जास्त राजकारण असते. त्यामुळे आपला कामधंदा बरा आहे असे वाटले. म्हणून मी राजकारणातून बाहेर पडलो.

मी खूप चांगल्या लोकांना भेटलो. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. वाईट लोकांकडूनही चांगल्या गोष्टी शिकलो. त्यामुळे शिकत राहण्याचा प्रयत्न करत राहिलो, असे अभिजीत म्हणाला.

टॅग्स :अभिजीत सावंतइंडियन आयडॉलबिग बॉस मराठीशिवसेना