Join us  

"अर्ध्यावरती डाव मोडला...", अरबाजच्या नसण्याने निक्कीची झाली वाईट अवस्था; प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:01 PM

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: निक्कीची अवस्था पाहून काय वाटतं?

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात काल एलिमिनेशन पार पडलं. अरबाज पटेल (Arbaz Patel) हा कमी मतं मिळाल्याने घराबाहेर गेला. त्याच्या जाण्याने सर्वात जास्त धक्का निक्की तांबोळीला (Nikki Tamboli)  बसला. अरबाज आणि निक्कीची जोडी ही नेहमीच चर्चेत असायची. अरबाज घराबाहेर गेल्यानंतर निक्कीची सकाळ अशी उदास झाली आहे. याचा नवीन प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला आहे.

बिग बॉस मराठीमध्ये काल झालेल्या भागात रितेश देशमुख गैरहजर होता. त्याच्या जागी निलेश साबळे यांनी सूत्रसंचालन केले. काल रविवार असल्याने नियमाप्रमाणे एलिमिनेशन पार पडले. अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर नॉमिनेट होते. यांच्यात निक्की आणि अरबाज डेंजर झोनमध्ये गेले तर बाकीचे सुरक्षित झाले. दरम्यान कमी मतं मिळाल्याने अरबाज एलिमिनेट झाल्याचं बिग बॉसने जाहीर केलं. यानंतर निक्की ढसाढसा रडली. अरबाज घराबाहेर गेल्यानंतर निक्कीची कशी अवस्था झाली आहे हे नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे. घरात स्वत:ला राणी समजणारी निक्की आता हलली आहे हे तिनेच मान्य केल्याचं दिसतंय. 

या प्रोमोवर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. 'आम्हाला निक्कीचं दु:ख बघवत नाही, निक्की ये बाहेर तू','पुढच्या आठवड्यात तू पण जा त्याच्याकडे' अशा कमेंट्स निक्कीसाठी आल्या आहेत. तर काही जणांनी तिला सपोर्टही केला आहे. अरबाजच्या नसण्याने आता निक्कीचा खेळ कसा असेल हे पाहायला मजा येणार आहे.

दरम्यान यंदाचा बिग बॉसचा सीझन हा १०० नव्हे तर ७० दिवसांचाच असणार अशी एक चर्चा सुरु आहे. आजच्या भागात स्पर्धकांसमोर बिग बॉस मोठी घोषणा करणार आहेत. ती घोषणा काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीसोशल मीडियाट्रोल