Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाण आपल्या साध्या, सरळ वागण्यातून सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसच्या घरातील कामं तक्रार न करता करत असतो. कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला होता, ज्यामध्ये सूरज घरामध्ये कचरा काढताना दिसला. त्याच्या या कामाचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं. यानंतर आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने देखील सूरजच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. तसेच मला तुझा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
"बिग बॉसच्या इतिहासात एकच स्पर्धक असेल ज्याने या घराला आपलं घर मानलं, तो म्हणजे सूरज चव्हाण" असं रितेशने म्हटलं आहे. तसेच "किचनमधील काम म्हणजे जास्त जबाबदारीचं काम आणि सर्वात कमी लेखलं जाणारे काम म्हणजे साफसफाई. काही लोक ते करतात पण त्यातही मोठेपणा दाखवतात. पण बिग बॉसच्या इतिहास सूरज हे एकमेव आहेत, ज्यांनी या कामाला कधीच कमी लेखलं नाही."
"निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही एकमेक पॉझिटिव्ह गोष्ट"
"मला हे सांगायला अभिमान वाटतो की, सूरज चव्हाण हे स्वत:चं घर म्हणून साफ करतात. मी सर्व सीझन पाहिलेत. बिग बॉसच्या इतिहासात एकमेव स्पर्धक असतील ज्यांनी या घराला आपलं घर मानलं ते म्हणजे सूरज चव्हाण. आपण घरातील धूळ कचरा बाहेर काढतो ना तेव्हा घरातील निगेटिव्ह गोष्ट बाहेर जाते. या घरातील निगेटीव्हिटीमध्ये तुम्ही एकमेक पॉझिटिव्ह गोष्ट आहात."
"तुम्ही घाबरू नका, बिनधास्त भिडा आणि नडा"
"मला कळतंय, तुम्हाला टास्क कळायला वेळ लागतो. जास्त समजत नाही, दडपण येतं आणि तुम्ही विचार करता. पण तुम्ही घाबरू नका, बिनधास्त भिडा आणि नडा. तुमच्यात ते तेज दिसलं, टास्कमध्ये तुम्हाला एकजण बोलला की, एक बुक्कीत तुझं मुंडकं छाटेन, पण तुम्ही माघार घेतली नाहीत. याला बोलतात हिंमत. दहा दिवस झाले आता कोणाला फरक पडत नाही. तुम्ही तुमचं मत मांडा, इतर लोक ऐकत नसतील पण महाराष्ट्र ऐकत आहे" असं रितेशने सूरज चव्हाणला म्हटलं आहे.
"शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान..."
लोकप्रिय मराठी गायक उत्कर्ष शिंदेने कमेंट केली असून सूरजचं कौतुक केलं आहे. "एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, एकटा नडतो, आणि एकटाच पुढे पण असणार, दिसणार" असं म्हणत उत्कर्षने सूरजला फूल सपोर्ट केला आहे. "ही ड्यूटी नको, ती ड्यूटी नको, कधी बोलला ❌ शिक्षण नसूनही कधी भाषेत माज, दुसऱ्यांचा अपमान दिसला?❌ कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? ❌ कोणत्या मुलीचा अपमान केला?❌ गेममध्ये टिकण्यासाठी खोटं प्रेमाचं नाटक, रडणं, रुसणं, फुगणं, असं काही एक केलं का ❌ एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, एकटा नडतो, आणि एकटाच पुढे पण असणार, दिसणार" असं उत्कर्षने म्हटलं आहे.