शिव ठाकरे (Shiv Thakare) हा 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. अमरावतीच्या या वाघाने प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं होतं. त्याचा प्रेमळ स्वभाव, तसंच कमालीचा फिटनेस पाहून तो सर्वच बाबतीत अग्रेसर ठरला होता. त्याची लोकप्रियता इतकी की शिवला नंतर बिग बॉस हिंदीतही ब्रेक मिळाला. तिथेही तो रनर अप ठरला. सलमान खानचंही त्याने मन जिंकलं. तर हा आपला शिव नुकताच बिग बॉसच्या घरात जाऊन आला. बिग बॉस मराठी ५ च्या स्पर्धकांना त्याने ग्रँड सेलिब्रेशनचं सरप्राईज दिलं.
कोण विजेता होणार? शिव ठाकरे म्हणतो...
बिग बॉसच्या घरात जाऊन शिव ठाकरेने सर्व सदस्यांशी संवाद साधला. तसंच प्रत्येकाला बाहेर आणत त्याने चाहत्यांसोबत ग्रँड सेलिब्रेशनचं सरप्राईज दिलं. यानंतर 'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेने कोण विजेता होऊ शकतो याचा खुलासा केला. तो म्हणाला, "मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की वोटिंगनुसार सूरज जिंकेल. तर गेमनुसार अभिजीत सावंतने जिंकायला पाहिजे. मला दोघंही आवडतात. एक खूप शिस्तीत, मर्यादा न ओलांडता खेळला. तर दुसरा ज्याला गेम माहितच नाही, षडयंत्र करत नाही तोच खरा प्लेयर असतो. तो लोकांना जास्त आवडतो जसा सूरज आहे. तसं पाहिलं तर त्याला गरज आहे. त्याचं पुढे आयुष्य आहे. अभिजीत दादा तर आधीच मोठं व्यक्तिमत्व आहे. पण हे दोन खेळाडू मला वाटतात."
तो पुढे म्हणाला, "निक्की तर प्लेयर आहे. ती आधीच बिग बॉस करुन आली आहे. इतर सदस्य अंकिता, डीपी, जान्हवी यांना जे जे हवंय ते मिळालंय. पण ट्रॉफी ही सूरजच्या हाती येईल. त्याला गावागावातून पाठिंबा आहे. त्याच्यासाठी आपुलकी आहे. पण जर कोणी खूप मेहनत घेऊन खेळला तर तो अभिजीत सावंत आहे असं माझं मत आहे. बाकी तुम्ही ठरवा. मी कोणा एकाची बाजू घेऊ शकत नाही कारण मी बिग बॉस कुटुंबातला आहे. माझा पाठिंबा बिग बॉसला."