Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. मनोरंजनाचा बॉस असलेल्या या कार्यक्रमात दिवसेंदिवस घरातील समीकरणे बदलेली पाहायला मिळत आहेत. या सीझनच्या पहिल्याच दिवसापासून स्पर्धक निक्की तांबोळी टीकेची धनी ठरली आहे. तिच्या बेताल वक्तव्यामुळे ती कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. अशातच निक्कीने केलेल्या एका हरकतीमुळे 'बिग बॉस मराठी'चा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने तिला चांगलच सुनावलं आहे.
नुकताच कलर्स मराठी वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निक्की आणि वैभवमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसतंय. त्यामुळे निक्कीला राग अनावर होतो आणि ती समोर टेबलावर ठेवलेल्या जेवणाच्या प्लेट्स लाथ मारून उडवते. यावर उत्कर्षणे व्हिडीओवर कमेंटच्या माध्यमातून निक्कीला फटकारलं आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना त्याने लिहलंय, "आपण काम करतो कारण पैसे मिळवून २ वेळेचं अन्न ताटात घेता येईल. जेवणाआधी वदनिकवळ म्हणणारी आपली संस्कृती. शिवाय जेवणानंतर ताटाला नमस्कार करणारी आपण माणसे आहोत. मर्यादा सोडून मोठ्यांचा अपमान सर्सास होतो. पण, आता रागात अन्न ज्या ताटात घेता त्यालाही लाथाडताय? माज असावा पण इतकाही नसावा की नंतर लाज वाटेल". असं म्हणत उत्कर्षणे निक्कीची कानउघडणी केली आहे.
निक्की-वैभवच्या वादाचं कारण काय?
त्याचं झालं असं, निक्की-वैभव-अरबाज तसेच इरिना हे चौघे जण गार्डन एरियात बसलेले असतात. तेव्हा निक्की मोठ्या आवाजात इरिनाला उद्देशून म्हणते बरं झालं नॉमिनेट झाली. आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे. ही माझ्या ग्रुपमध्ये पहिल्यापासून नव्हती. ती आता अॅड झाली. हे ऐकूण वैभवला राग येतो. त्यावर तो म्हणतो, अती होतंय निक्की तुझं आता. तुझं काहीही फलतू मी ऐकुन घेणार नाही. वैभवला उत्तर देताना ती म्हणते, तुला नाही बोलली मी इरिनाला बोलली. तु कानात बोटं घाल. पुढे वैभव निक्कीला उत्तर देत म्हणतो, तुझ्या पण हाताला बोटं आहेत ना ती तोंडात घाल. वैभवचा पलटवार निक्कीला सहन होत नाही आणि ती रागावते. शेवटी कॅप्टन नुक्की वैभव चव्हाणला सुनावते, ती तुला घरातून घेऊन नाही आली माझा म्हणून असं म्हणत ती टेबलावरच्या प्लेट्सना लाथा मारून खाली फेकते.