सध्या सर्वत्र चर्चा आहे ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची. या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या घरातील प्रत्येक सदस्य आपल्या खेळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पर्वात रिलस्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण सहभागी झाला आहे आणि त्याला महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळताना दिसत आहे.
मुळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाणची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. बालपणीच त्याने आई वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने मोलमजुरी करत दिवस काढले. आपल्या मेहनतीच्या जोरावर तो इथपर्यंत पोहचला आहे. तुम्हाला माहिती आहे का, बिग बॉसच्या घरात दाखल होताना सूरज फक्त दोन टी शर्ट आणि पायात तुटलेली चप्पल घालून आला होता. सेटवर आल्यावर त्याला कपडे आणि शूज देण्यात आले होते. आता घरात सूरज इतरांप्रमाणे डिझायनर कपड्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. एवढंच नाही तर भाऊच्या धक्क्यावर सूरजच्या कपड्यांचं कौतुकदेखील होताना दिसले.
कोण आहे सूरजची आउटफिट डिझायनरसूरज चव्हाणने नुकतेच घातलेला एक शर्ट खूप चर्चेत आला होता. हा शर्ट पाहून रितेश देशमुखनेही कौतुक केले होते. पांढऱ्या रंगाच्या शर्टवर त्याचे लोकप्रिय असलेले डायलॉग पाहायला मिळाले. त्यामुळे त्याच्या डायलॉगप्रमाणे शर्टवरील डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याला हे आउटफिट कोणी दिले असेल याची चर्चा सुरू झाली. त्याचे बिग बॉसच्या घरातील कपडे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सौम्या पठाण डिझाइन करते आहे. तिने सूरजचा प्रत्येक आउटफिट डिझाइन केला आहे. तसेच सूरजसाठी डिझाइन करण्यात आलेले कपडे हे त्यालाच देण्यात आले आहेत. कारण, एरव्ही सदस्यांसाठी डिझाइन केलेले कपडे हे त्यांनी वापरुन झाल्यावर परत करण्यात येतात. मात्र, डिझायनर सौम्याने हे कपडे सूरजलाच दिले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे.