बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi 5) मध्ये सध्या धमाल सुरु आहे. या पर्वाचा सध्या दुसरा आठवडा आहे. वर्षा उसगांवकर-निक्की यांची भांडणं, जान्हवीचा आगाऊपणा, DP-पुढारी-पॅडीची कॉमेडी यामुळे मजा येत आहे. कुठे अरबाज-निक्की, इरिना-वैभवमध्ये प्रेमही फुलतंय. अशा या धमाल आठवड्यात यावेळी भाऊच्या धक्क्यावर चक्क अक्षय कुमारने एन्ट्री घेतली आहे. अक्षय कुमार रितेश देशमुखचा चांगला मित्र आहे. दरम्यान कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोत अक्षय कुमार (Akshay Kumar) वर्षा उसगांवकरांना पाहून असं काही म्हणतो की त्या लाजतात. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही गाजवली होती. 'तिरंगा','हत्या द मर्डर','घर जमाई', 'हस्ती', 'हनिमून' या काही हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. यातील 'हत्या द मर्डर' मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. २००४ साली हा सिनेमा आला होता. यानंतर २० वर्षांनी वर्षा उसगांवकर आणि अक्षय कुमार एकमेकांसमोर दिसत आहेत. मात्र वर्षा सध्या बिग बॉसच्या घरात आहेत तर अक्षय कुमार पाहुणा म्हणून आला आहे. यावेळी अक्षय वर्षा यांना पाहून हसतच म्हणतो, 'वर्षा किती वर्षांनी दिसतेयस तू'. हे ऐकताच वर्षा उसगांवकर लाजतात. कलर्स मराठीने हा प्रोमो शेअर केला आहे.
आज कलर्स मराठीवर 9 वाजता भाऊच्या धक्क्यावर हा एपिसोड पाहता येणार आहे. यावेळी अक्षय कुमार DP आणि इतर सदस्यांशीही बोलताना दिसतो. अक्षय कुमार त्याच्या आगामी 'खेल खेल मे' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला आहे. त्याच्यासोबत सिनेमाची इतर स्टारकास्ट तापसी पन्नू, फरदीन खान, वाणी कपूर, एमी विर्क हे देखील आलेले दिसले.