Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. शनिवारी भाऊचा धक्का पार पडला. यावेळी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर जान्हवी किल्लेकरसह अरबाज, वैभव, निक्की या सदस्यांची चांगलीच शाळा घेतलेली पाहायला मिळाली. तसेच रितेशने घरातील काही सदस्यांचं कौतुक देखील केलं. गुलिगत धोका फेम सूरज चव्हाणला कोणालाही न घाबरता बिनधास्त खेळण्याचा सल्ला देखील दिला.
रितेश देशमुखने योगिता चव्हाणचं नाव घेताच तिने तिच्या मनातील एक इच्छा सर्वांसमोर बोलून दाखवली. बिग बॉसच्या घरातून बाहेर जायचं असल्याचं म्हणत तिला अश्रू अनावर झाले. तिचा हा मोठा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. "मला काही गोष्टींचा खूप मानसिक त्रास होत आहे. मला माहीत नाही हे बोलणं कितपत योग्य आहे. पण मला खरंच बाहेर यायचं आहे."
"मी संपूर्ण टीमची माफी मागते. खूप लोक बोलतातहेत की तू यायला नाही पाहिजे होतं. हे बरोबर आहे. माझा निर्णय चुकला असेल... त्यासाठी सॉरी. पण मला खरंच इथे खूप त्रास होत आहे" असं म्हणून योगिता रडायला लागली. अभिनेत्रीला रडताना पाहून रितेश तिला समजवायला लागला. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहात असं म्हणत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.
"बिग बॉसच्या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही राहायचं, हे मी ठरवत नाही तर जनता ठरवते. पण आतापर्यंत बिग बॉसच्या घरात योगिता गेम सो़डायचा विचार करत असतील असं आम्हाला केव्हाच वाटलं नाही. आता तुम्ही सांगत असतानाच तुम्ही असा विचार का करताय? असं वाटतंय. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहात. कायम अशाच खेळत राहा तुम्ही. थोडा वेळ घ्या. विचार करा. इतरांसोबत बोला. तुम्ही एक स्ट्राँग महिला आहात" असं रितेश देशमुखने म्हटलं आहे.