ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झालेला रिएलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ सध्या बराच चर्चेत आहे. हा शो लवकरच त्याच्या महाअंतिम सोहळ्याकडे येत आहे. त्यामुळे घरातील सदस्य खूप मेहनत घेताना दिसत आहेत. बिग बॉस ओटीटीच्या घरात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. आता घरातील सदस्य स्वःबळावर गेम खेळताना दिसतील. बिग बॉसच्या या मोठ्या निर्णयामुळे घरातील सदस्य चिंताग्रस्त झाले आहेत. तर घरातील स्ट्रॉंग सदस्य शमिता शेट्टीला, दिव्या अगरवालची भीती वाटत असल्याचे ती राकेशला सांगताना दिसते आहे.
बिग बॉस ओटीटी शोच्या सुरूवातीला शमिता आणि दिव्याचे खूप चांगले संबंध होते, त्यांच्यात घट्ट मैत्री होती. पण त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे त्या दोघीनी एकमेकांशी अबोला धरला आहे. आगामी काळात निशांत भट्ट आणि दिव्या एकत्र आले तर? या विचाराने शमिता घाबरली आहे. असे तिने राकेश बापटला सांगितले. त्यांच्यामधील या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत शमिता राकेशला सांगताना दिसते आहे की, तू विचार का नाही करत? निशांत आणि दिव्या एकत्र आले तर ते आपल्यासाठी चांगले नाही. माझा दिव्यावर अजिबात विश्वास नाही आणि तुमचा जर असेल तर तुम्ही वेडे आहात. दिव्या सुरूवातीपासून एकटी खेळत आली आहे आणि जर ती आणि निशांत एकत्र आले तर ते आपल्यासाठी चांगले नाही.त्यावर राकेश तिची समजूत काढत सांगतो की, दिव्या आणि निशांतपासून काहीच धोका नाही. परंतु राकेशचे म्हणणे तिला पटत नसल्यामुळे राकेश तिच्यावर रागावला आणि तिला तू डॉमिनेटिंग आहेस, ज्या पद्धतीत त्यांच्याशी बोलतेस ते मला अजिबात आवडत नाही, असे म्हणतो.