झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील समर पाटील व खानावळीची मालकीण सुमी यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या प्रवासाबद्दल...
अमृताचा जन्म ११ ऑक्टोबर, १९९७ साली झाला असून मुळची कोल्हापूरची आहे. तिचे शिक्षण पुण्यात झालं आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री मिथुन चित्रपटातून केली. या चित्रपटात तिने कांचीची भूमिका साकारली होती. त्याआधी तिने लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख तिला ‘मिथुन’ या चित्रपटातून मिळाली.
या मालिकेत भूमिका मिळालेल्या संधीबद्दल एका मुलाखतीत तिने सांगितलं की, हा चित्रपट केल्यानंतर सर्व लक्ष पदवीच्या अभ्यासावर केंद्रित केलं होतं. त्यामुळे त्या काळात फार काम केलं नाही. परीक्षा झाल्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली. खरं तर छोट्या पडद्यावर काम करण्याचा मी कधी विचार केला नव्हता. मात्र मालिकांत काम करण्याचा अनुभव घेऊन पाहू, असा विचार करून मी ऑडिशन दिली होती. त्यात माझी निवड झाली आणि मालिका मिळाली.
छोट्या पडद्यावर काम करणं तितकंच आव्हानात्मक आहे. मालिका प्रेक्षकांना रोज बघता यावी, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत घेणं देखील मी छान एन्जॉय करत असल्याचं अमृता सांगते.