समय शाहचा आज वाढदिवस असून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे त्याच्या चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत तो गोगीची भूमिका साकारत असून टप्पू सेनामधील हा सर्वात छोटा सदस्य लोकांना प्रचंड आवडतो. या मालिकेत समय एक पंजाबी मुलाची भूमिका साकारत असला तरी तो खऱ्या आयुष्यात गुजराती आहे. या मालिकेत तो पंजाबी दाखवण्यात आला असल्यामुळे त्याच्या डोक्यावर आपल्याला नेहमी पगडी पाहायला मिळतो. त्यामुळे खऱ्या आयुष्यात समय खूपच वेगळा दिसतो.
समय तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा सुरुवातीपासूनचा भाग आहे. पण या मालिकेत काम करण्याआधी समयची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्याच्या घरात झोपण्यासाठी अंथरुणं देखील नव्हती. पण आज त्याने करोडोचे घर मुंबईत घेतले आहे. समयनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. समयने एक साक्षात्कार या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी अभिनयक्षेत्रात संघर्ष करत असताना आमच्या घरची परिस्थिती खूपच वाईट होती. आमच्याकडे झोपण्यासाठी अंथरुणंदेखील नसायची. आम्ही जमिनीवर झोपायचो. पण एक दिवस मी मुंबई शहरात स्वतःचं घर घेणार असे मी पक्कं ठरवलं होते. अनेक वर्षांनंतर माझे हे स्वप्न पूर्ण झाले.
समयने या मुलाखतीत पुढे सांगितले होते की, मुंबईत घर घेण्याचे माझे स्वप्न काहीच वर्षांपूर्वी पूर्ण झाले. घर घेतल्यानंतर मी प्रचंड खूश झालो होतो. माझे पालक आता एका चांगल्या घरात राहातात, त्यांना सगळ्या सोयी-सुविधा मिळतात हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पूर्वी टप्पूची भूमिका भाव्या गांधीने साकारली होती. भाव्या आणि समय हे खऱ्या आयुष्यात भावंडं आहेत.